आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ५, जुलै, २०२२
डॉ घन:शाम बोरकर डॉक्टर की इंजिनियर..!?
या विलेपारल्यातील आधुनिक उद्योजकांच्या यशस्वी कारकीर्दीचा परिचय लेख लिहितांना नेहेमी एक प्रश्न समोर उभाच असतो..!..विशेषतः तरुण-तरुणींनी स्वीकारलेला उपजीविकेचा पेशा – नोकरी – व्यवसाय – उद्योग आणि त्याआधीची त्यांची शिक्षण पार्श्वभूमी यातील सुसंगती (!) आणि कधी दिसणारी विसंगती (!) अशी दोन उद्गार चिह्न, हा प्रश्न बरोबर घेऊन येतो. शैक्षणिक पार्श्वभूमी आणि नंतरचा व्यवसाय – उद्योग – नोकरी हे दोन्ही एकमेकांना पूरक असणे, हे साहजिक आहे त्यामुळे ते सुसंगत आहे. मात्र शैक्षणिक पार्श्वभूमी आणि व्यवसाय – उद्योग यातील भिन्नता, ही विसंगती म्हणावी.
डॉ घन:श्याम बोरकर वर्ष १९७७ मध्ये सायनच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS ची पदवी उत्तीर्ण झाले. पारले टिळक विद्यालय या शाळेत, एक हुशार विद्यार्थी अशी सहाध्यायी आणि शिक्षकांना त्यांची ओळख होती. विलेपारल्यातील पारलेश्वर सहकारी सहनिवास संकुलात त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य होते. पारल्यातील साधारण वर्ष १९५० नंतर माननीय श्री बाबुराव परांजपे यांनी स्थापन केलेल्या या आणि अशा सहकारी सहनिवास संकुलांची काही वैशिष्ट्ये आजही टिकून आहेत. साधारण शंभर ते दीडशे मध्यमवर्गी मराठी कुटुंबांचे निवास असलेल्या या प्रत्येक संकुलात, मुलांना खेळण्यासाठी खूप मोकळ्या जागा आणि आवारे आहेत. विलेपारल्याच्या शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक रचनेचा आणि जीवनशैलीचा प्रभाव, या संकुलांवर आजही स्पष्ट दिसतो. इथल्या तत्कालीन आणि विद्यमान तरुण रहिवाशांनी, साहित्य-लेखन-वैद्यकीय सेवा-व्यवसाय-आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान उद्योग-कलाक्षेत्र-शेतकी अशा विविध क्षेत्रांत खूप मोठे यश प्राप्त केले आहे. MBBS पदवीनंतर डॉक्टरी व्यवसाय सुरू केला त्यावेळी संकुलातील रहिवासी नागरिकांना, डॉ बोरकर विनामूल्य सल्ला-सेवा देत असंत अशी आठवण ते नम्रपणे सांगतात. यांच शिक्षण कालावधीत चार वर्षे, पारल्यातील तत्कालीन हजारासिंग यांच्या ऑर्केस्ट्रामधे ते मेंडोलीन वाजवत असंत. त्याच काळांत व्यायाम आणि शरीरसौष्ठव यांचा छंद डॉ बोरकरांनी जपला होता. माटुंगा अथलेटीक क्लबतर्फे त्यांची ‘मुंबई श्री’ या स्पर्धेसाठी स्पर्धक म्हणून निवड झाली होती.

< डॉ घन:श्याम बोरकर
आपल्या वर्गातच शिकणाऱ्या चि राजश्री करंदीकर हिच्याशी वर्ष १९७७ मधे डॉ बोरकरांचा विवाह संपन्न झाला. पुढची वर्ष १९७९ पर्यंतची दोन वर्षे खूपच कष्टाची होती. संसार सुरू झाला होता मात्र MBBS पदवी मिळणे बाकी होते. यांच दरम्यान साधारण एक वर्ष, दिवसा कॉलेज आणि त्यानंतर रात्री बारा पर्यंत देवनार-गोवंडी परीसरातील एका डॉक्टरकडे, दैनंदिन १७ रुपये रोजगारावर ते लोकम म्हणून दिवसा काम करत असंत. MBBS पदवीप्राप्तीनंतर गोवंडीच्या डॉक्टरकडील काम बंद करून, वर्ष १९७८ मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा विभागात प्रवेश केला. वर्ष १९८६ पर्यंत ते महानगरपालिकेच्या सेवेत होते. पहाटे ५.०० ते ९.०० इंडियन एअरलाईन्स, सांताक्रूझ, ९.३० ते ४.०० महापालिका रुग्णालयात काम, ४.०० ते ५.०० सानेगुरुजी विद्यालय, ५.३० ते ७.३० वांद्रे येथील अलियावर जंग इंस्टिट्यूट आणि काही काळ रात्री बारा पर्यंत सांताक्रूझ पूर्व परिसरातील गोळीबार चाळ वस्तीमध्ये आपला स्वतंत्र डॉक्टरी व्यवसाय असा त्याकाळातील त्यांचा दिनक्रम कष्टाचा होता. यांच कालावधीत त्यांनी वर्ष १९८३ मध्ये अगदी छोट्या प्रमाणात, स्वतःच्या प्लॅस्टिक मोल्डींग उद्योगाची सुरुवात केली होती. चाळीस वर्षांनंतर डॉ बोरकरांच्या आजच्या उद्योग-व्यवसाय विस्ताराचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर…ते असे आहे. BOROPLAST and it’s sister concerns are India’s leading Prefabricated Portable solution provider.
वर्ष १९८६ पर्यंतचा तो काळ खूप संघर्षाचा होता. सांताक्रूझ पूर्व परिसरातील गोळीबार परिसरातील चाळ वस्तीमध्ये आणि देवनार-गोवंडी परीसारतील चाळ वस्त्यांमधील काही काळ केलेले डॉक्टरी व्यवसाय हे मोठेच आव्हान होते. दाटीवाटीने वसलेल्या चाळी – अस्वच्छ परिसर – दीडशे-दोनशे गरीब रुग्णांची गर्दी – बेकायदेशीर कामे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांचा शेजार अशा वातावरणात त्यांचे काम चालत असे. दोन वेळा ट्रेन आणि दोन वेळा बस बदलून पारला – गोवंडी असा रोजचा तीन-चार तास प्रवास करण्यात सोळा-अठरा तास सहज निघून जात असंत. वर्षभरातील हा दिनक्रम, हे आव्हानाचे दिवस, म्हणजे माझी खरी अनुभवाची शिदोरी आहे असे डॉ बोरकर प्रांजळपणे स्पष्ट करतात. आजच्या काळातील माझ्या आणि कुटुंबाच्या यशाचे सर्व श्रेय, माझ्या पालकांना-पारलेश्वर निवासी संकुलाला, पारले टिळक विद्यालय या माझ्या शाळेला आणि लोकमान्य सेवा संघ या संस्थेला आणि अर्थातच विलेपारल्याच्या समाजजीवनशैलीला आहे असे ते भावुकपणे सांगतात.
वर्ष १९८३ मध्ये प्लॅस्टिक मोल्डींग व्यवसाय सुरू केला, मात्र तो काळ पहिल्या-दुसऱ्या इयत्तेत शाळेचा अभ्यास पुन्हा सुरू करावा अशाच स्वरूपाचा होता. वर्ष १९८६ पर्यंत महापालिकेच्या सेवेत असलेल्या, डॉक्टरीचा अभ्यास केलेल्या डॉ बोरकरांना आता मेल्ट मोल्डींग, कॉंप्रेशन मोल्डींग, ट्रान्सफर मोल्डींग, इंन्जेक्शन मोल्डींग अशा प्लॅस्टिक मोल्डींग इंजिनिअरिंग तंत्राचा अभ्यास करण्याचे आव्हान उभे होते. सिंटेक्स या नावाजलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या निर्मात्या कंपनीसाठी अनेक मोल्ड डॉ बोरकरांच्या कारखान्यात तयार केले जात होते. वर्ष १९९४ पर्यंत सिंटेक्सच्या टाक्या जॉबवर्क मधे तयार केल्या जात होत्या आणि त्यांचे मार्केटिंग करतांनाच BOEOPLAST सिंटेक्सचे एक नंबरचे डिस्ट्रिब्यूटर होते. Self Motivation अर्थात स्वयंप्रेरणा आणि Self Inspiration अर्थात स्वयंऊर्जा, या दोन क्षमता निसर्गदत्त प्राप्त झालेल्या या बहुआयामी उद्योजकाचे, नंतरच्या चाळीस वर्षांतील प्लॅस्टिक उत्पादनातील यश उल्लेखनीय आहे. त्याचाच हा परिचय लेख आहे.
वर्ष २००५ मध्ये, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग मधली पदवी मिळवून, डॉ घन:श्याम बोरकरांचा मुलगा श्री आदित्य बोरकर याने वडिलांच्या उद्योगात उमेदवारी सुरू केली होती. आज तो BOROPLAST उद्योगाचा CEO म्हणून या उद्योगाचे व्यवस्थापन तो करतो आहे. अलीकडच्या काळांत, टाइम्स ऑफ इंडिया तर्फे पॉलिमर व्यवसायातील यशस्वी उद्योजक वर्ष २०१९, या पुरस्काराने आदित्यला सन्मानित केले गेले आहे. करोना काळातील ‘सॅनीटायजर डिस्पेंसर’ यंत्र आणि ‘सॅनीटायजर टनेल’ या दोन नव्याने विकसित केलेल्या उत्पादनांसाठी टाइम्स ऑफ इंडिया तर्फे वर्ष २०२२ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया तर्फे पुरस्काराने पुन्हा सन्मानित केले गेले आहे. विख्यात अभिनेता श्री अमिताभ बच्चन यांनी करोना काळांत या दोन उत्पादनांना मान्यता देऊन, त्यांच्या घरासह त्यांच्या अनेक आस्थापनांमध्ये याचा वापर केला आणि अनेक स्नेही-सुहृदांना भेट म्हणून पाठवल्या आहेत.

< श्री आदित्य घन:श्याम बोरकर
बहूआयामी – अष्टपैलू – हरहुन्नरी…. ही विशेषणे, आपल्या वडिलांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाचे यथार्थ वर्णन करायला कदाचित अपुरी पडतील असे आदित्य स्पष्ट करतो. प्लॅस्टिक उद्योगात अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण नवीन संकल्पना मांडून त्यांनी त्या प्रत्यक्षात आणल्या. नव्या संकल्पनांचा ध्यास घेऊन सतत अभ्यास, संशोधन, R&D मध्ये कायम व्यस्त असणारे माझे वडील, जगाच्या तीस वर्षे पुढचा विचार करत होते आणि आजही करत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही आपल्या निर्मितीचा आनंद कसा घ्यायचा आणि मग ते मागे सारून पुन्हा नव्या आव्हानाकडे कसे वळायचे त्याचा नेमका परिपाठ म्हणे माझ्या वडीलांचे दैनंदिन व्यवहार. त्यांचे प्रत्येक विषयातले यश त्यांनी नम्र भावनेने स्वीकारले, त्यासाठी ते समाजाप्रति कृतज्ञ राहिले. अलीकडच्या काळांत काही जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवून थोड्याशा निवृत्तीनंतर ते, आपल्या निसर्गदत्त प्रतिभेने, निरपेक्षवृत्तीने, ते या समाजाचे ऋण अंशतः फेडत राहिले आहेत.
घर / केबिन / वॉचमन चौकी / कंटेनर / टॉयलेट / बँक ब्रांच / दुकान अशाचे कारखान्यात तयार केलेले पूर्वरचीत सुटे भाग नंतर जागेवर नेउन एकामेंकास जुळवून बांधणी करणे म्हणजे Prefabricated Portable fiber structures असे डॉ बोरकर यांच्या आजच्या उद्योगाचे स्वरूप आहे. याबरोबरच गार्डन प्लांटर्स – रोटोमेटेड प्लांटर्स – गारबेज बीन – डस्टबीन – निर्माल्य कलश – शौचालये – रोड ब्लॉक – टोल केबिन – सर्व्हिस काऊंटर्स – कॉफी शॉप काऊंटर्स – सॅनीटायजर टनेल असे प्लॅस्टिक, पॉलिमर, एफ् आर् पी आणि स्टील पासून बनवलेली असंख्य उत्पादने यांची वसई औद्योगिक वसाहतीत पंचवीस हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या कारखान्यांत निर्मिती केली जाते. यातल्या काही निवडक उत्पादनांचे फोटो लेखासोबात जोडले आहेत. देशभरातील सर्वच राज्यांना या विविध उत्पादनांचा पुरवठा केला जातो.
![]() ^ प्रीफॅब टॉयलेट ब्लॉक |
^ प्रीफॅब टॉयलेट इंटीरिअर |
![]() ^ प्रीफॅब सर्विस काऊंटर |
![]() ^ प्रीफॅब वॉचमन केबिन |
![]() ^ सॅनीटायजर यंत्र |
![]() ^ प्रीफॅब सॅनीटायजर टनेल |
^ प्रीफॅब बँक ब्रांच |
^ प्रीफॅब एटीएम काउंटर |

^ प्रीफॅब स्टोअर
डॉ बोरकर यांनी MBBS पदवी प्राप्त करून पुढची आठ वर्ष डॉक्टरकी केली आणि त्याच वेळी इंजिनीअर बनून आपल्या स्वतंत्र व्यवसायची सुरुवात केली होती. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीत आणि व्यवसाय – उद्योगात विसंगती आहे ती अशी. संस्कृत भाषा आणि कालिदासाच्या संपूर्ण साहित्याचे विद्वान अभ्यासक, पारल्याचे तत्कालीन रहिवासी माननीय कै बा का लिमये यांच्या मार्गदर्शनाने मेघदूतासह कालिदासाच्या अन्य संस्कृत साहित्याचा अभ्यास डॉ बोरकरांनी तीस वर्षांपूर्वी केला आहे. माझी खात्री आहे की डॉ घनःश्याम बोरकर यांनी MBBS ऐवजी संस्कृत भाषेत पुढचा अभ्यास केला असता तर निश्चितच ते संस्कृत भाषा पंडित झाले असते. निव्वळ ‘मेघदूत’ या कालिदासाच्या संस्कृत महाकाव्याच्या, अनेक विद्वान अभ्यासकांनी वेगवेगळ्या भाषेत केलेल्या अनुवदाचे, किमान पन्नास ते साठ ग्रंथ आज डॉ बोरकरांच्या खाजगी ग्रंथसंग्रहात त्यांनी जपले आहेत. मेघदूत या महाकाव्यावरील त्यांच्या विशेष लोभाची सन्मानपूर्वक नोंद घेऊन, हा त्यांचा परिचय लेख, हिंदू वर्षाच्या आषाढ महिन्यांत प्रकाशित होतो आहे.

^ डॉ घन:श्याम बोरकर, सौ राजश्री, मुलगा श्री आदित्य, सून डॉ सौ नुपुरा
डॉ रामचंद्र पारनेरकर महाराज स्मृती ‘अक्षर वाङ्मय पुरस्कार’
डॉ बोरकरांचे कुटुंब मूळ गोव्यातील बोरी गावातील रहिवासी. १९९५ मध्ये गोव्यात आपली फॅक्टरी सुरू केल्यानंतर त्यांचे गोव्यातील वास्तव्य वाढले. त्याकाळात गोव्याचे तत्कालीन उद्योग मंत्री, नंतर गोव्याचे मुख्यमंत्री आणि आपले माजी संरक्षण मंत्री माननीय कै मनोहर पर्रीकर यांचा दीर्घकाळ स्नेह डॉ बोरकरांना प्राप्त झाला होता. गोव्यातील वास्तव्यात, वर्ष २००२ ते ०६ या काळांत, सकाळी २ तास – संध्याकाळी २ तास अशी चार वर्षे त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण, पंडित वसंतराव काडणेकर यांचेकडे झाले. त्याआधी वर्ष १९९९ पासून पुढे सतरा वर्षे त्यांनी पुण्यामध्ये, उस्ताद सैयुद्दीन डागर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. हरीदास स्वामींच्या नातवाने लीहिलेले ‘सुर – स्वर आणि श्रुतीज्ञान’ या ज्ञानशाखेवरील साडेचारशे वर्ष जूना उर्दू ग्रंथ आणि त्याचा हिंदी अनुवाद, उस्ताद डागर यांनी डॉ बोरकरांना दिला. त्या ग्रंथाचा अभ्यास करतांना, ऋग्वेद – सामवेद – यजुर्वेद – अथर्ववेद या काही हजार वर्षांपूर्वीच्या लिखित साहित्यात, प्राचीन भारतीय ऋषींनी स्वर आणि श्रुती संदर्भात काही नियम बनवले आहेत यावर संशोधन झाले. आधुनिक ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या स्वर आणि श्रुती यांचे डीकोडिंग, हा डॉ बोरकरांच्या सध्या सुरू असलेल्या संशोधन-अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. आधुनिक प्रगत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जात आहे.

< डॉ घन:श्याम बोरकर आणि श्री मनोहर पर्रीकर
MBBS नंतर नायर हॉस्पिटल मधून Pharmacology मधे MD केले असते तर डॉ बोरकर नक्कीच एक नामवंत औषध शास्त्रज्ञ झाले असते. महाविद्यालयात शिकत असतांना आणि नंतर काही काळ महानगरपालिकेच्या सेवेत असतांना, एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनयासाठी असंख्य पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ बोरकरांनी रंगभूमीवर आपली कारकीर्द करायचा निर्णय घेतला असता तर आज ते यशस्वी अभिनेता झाले असते.

^ घन बरसे रे – कविवर्य बा भ बोरकर काव्य रसास्वाद
नामवंत मराठी कवी माननीय पद्मश्री श्री बा भ बोरकर हे डॉ बोरकर यांचे काका. काकांच्या काव्यप्रतिभेचा वारसा प्राप्त झालेले डॉ बोरकर स्वतः एक प्रतिथयश कवी आहेत. त्यांच्या ‘खेळिया’ या कविता संग्रहाला अलीकडे डॉ रामचंद्र पारनेरकर महाराज स्मृती ‘अक्षर वाङ्मय पुरस्कार’ आणि वर्ष २०१८ – १९ चा आरती प्रभू स्मृती ‘कोमसाप’ वाङ्मयीन पुरस्कार’ अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मराठी कविता आणि कवींवर मनापासून प्रेम असल्याने त्यांनी बा भ बोरकर, सुरेश भट, कुसुमाग्रज या कवींच्या कवितांवर रसग्रहणाचे पाचशेच्यावर कार्यक्रम सादर केले आहेत. ‘घन बरसे रे’ हा कविवर्य बा भ बोरकर काव्य रसास्वाद कार्यक्रम, आणि आपल्या खेळिया या काव्यसंग्रहावरील कार्यक्रम, डॉ बोरकर आपली मुलगी सौ तेजश्री दीक्षित हिच्या बरोबर सादर करतात.

^ खेळिया – डॉ बोरकर काव्यसंग्रह

^ डॉ बोरकर आणि मुलगी सौ तेजश्री दीक्षित
याबरोबरच ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आणि स्वतःच्या खेळिया या काव्यसंग्रहावर त्यांचे कार्यक्रम रसिकमान्य झाले आहेत. डॉ बोरकर यांच्या कोंकणी, मराठी, हिंदी भाषेतील तीनशे कवितांची पुस्तके पुढील काळांत प्रकाशित होतील. कविवर्य बा भ बोरकर यांच्या गोव्यातील बोरी या गावांत, त्यांचे स्मारक बनविण्याचे काम सध्या मोठ्या वेगाने सुरू आहे. यासाठी गोवा राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून दिली आहे. ख्यातकीर्त चित्रकार श्री वासुदेव कामत, चित्रकार श्री सुहास बहुलकर, शिल्पकार श्री सुनील देवरे हे या प्रकल्पाचे सल्लागार आहेत. पद्मश्री बा भ बोरकर यांचे स्नेही दिल्लीचे शिल्पकार श्री राम सुतार त्यांचा पुतळा बनवत आहेत.
कालिदासाने मेघदूत महाकाव्यात त्याच्या मेघाच्या ‘धर्ममेघ’ समाधीचे वर्णन केले आहे. जलाने भरलेला आणि भारलेला मेघ जसा आपल्या जलाचा वर्षाव पृथ्वीवर करून पूर्ण रिक्त होतो, अगदी अशीच स्वतःला पूर्ण रिक्त करणारे, निरपेक्षवृत्तीची दैनंदिन जीवनशैली स्वीकारलेले आपल्या यशस्वी आधुनिक पारलेकर उद्योजक डॉ घन:श्याम बोरकर आजही कायम व्यस्त आहेत.
डॉ बोरकर यांचे कुटुंबीय – स्नेही – सुहृद आणि उद्योगातील सहकारी कर्मचारी यांना पारलेकरांतर्फे अनेकानेक शुभेच्छा..!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
–००–





