आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ७ , सप्टेंबर, २०२२
श्रीमती लता गुठे एका जिद्दी मुलीची गोष्ट…!
‘एका जिद्दी मुलीची गोष्ट’ हे या लेखाचे शीर्षक आणि सोबतच्या छायाचित्रातील मध्यमवयीन महिला, हे दोन्ही वाचकाला कदाचित विसंगत वाटेल; पण हे एकशेवीस टक्के वास्तव आहे. कुमारी लता खेडकर या जेमतेम पंधरा वर्षांच्या एका मुलीची, तिच्या जिद्द आणि चिकाटीची ही गोष्ट आहे. श्री राजाभाऊ खेडकर आणि सौ कमलाबाई यांची ही सुकन्या. राजाभाऊ खेडकर यांच्या कुटुंबाचे पिढीजात वास्तव्य भालगाव या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गावांत होते. यांच कुटुंबात, २३ जून १९६६ रोजी चि लता हिचा जन्म झाला होता. आणि तिथेच लताचे ९ वी पर्यंत शिक्षण झाले.
मोठ्या चिरेबंदी चौकाचा वाड्यात आजी, आजोबा, काका, काकू व त्यांची मुले अशा एकत्र कुटुंबामध्ये राहाणाऱ्या खेडकरांच्या कुटुंबातील सात भावंडांत, लता एकटीच मुलगी. शाळेतील अभ्यासात हुशार, सुस्वभावी मुलगी म्हणून ती घरातल्या सर्वांची लाडकी होती. घराच्या मोठ्या अंगणात खेळणे, भावंडांनी शाळेत एकत्र जाणे, गावातील सर्व उत्सवात सहभागी होणे. असा तिचा नित्यक्रम आनंदाचा होता. घरातील सर्व वडीलधाऱ्यांवर परंपरेने आलेल्या वैष्णव धर्म आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार होते. त्यामुळे या श्रद्धावान कुटुंबाच्या घरांत माऊलीच्या भक्तिचे वातावरण होते. तेच संस्कार लतामध्ये रुजले गेले.
घरी पिढीजात भरपूर शेती होती. लताचे वडील त्या काळात सातवी पास झाले आणि त्यांना शिक्षकाचे नोकरी मिळाली. राजकारण आणि समाजकारण यांत गती असल्यामुळे, शाळेतील नोकरी त्यांनी सोडली आणि पाथर्डी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. तिथे दहा वर्ष डायरेक्टर पदाचा पदभार सांभाळला. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे ते सतत कार्यव्यस्त असत. त्यामुळे घरी सतत राजकारणातील दिग्गज मंडळी येत असे आणि ते संस्कारही लतावर झाले. त्या काळात म्हणजे १९७० घ्या आसपास काळात गावागावात शाळा नव्हत्या. लताची आजी अशिक्षित होती परंतु तिने शिक्षणाचे महत्व जाणले होते. तिने तिच्या मुलांना तर शिकविलेच: परंतु इतर नातेवाईकांच्याही मुलांना आपल्या घरी आणून स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले आणि शिकविले. घरातील सर्व नातवंडे गावातल्या शाळेत जात असत. आजीमुळे घरांत वैष्णव भक्ति परंपरेतील भजन – कीर्तन – पोथी – पुराण – पारायणे असे कार्यक्रम नियमितपणे होत असंत. आजीमुळेच घरातील सर्व मुलांवर श्रद्धा आणि भक्ति भावनेचे अध्यात्मिक संस्कार झाले होते.

< श्रीमती लता गुठे
छोट्या लताचे काका, पाथर्डी येथील जनता महाविद्यालयात ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते. त्यांच्यामुळे लताला पुस्तक वाचनाची गोडी लागली. शाळेत चांदोबा – चंपक अशी लहान मुलांची लोकप्रिय असलेली मासिके येत असत. ती वाचण्यासाठी सर्व मुले उत्सुक असत. त्यांच्या शिक्षकांची एक अट असे, की जे गोष्टीची पाच पुस्तके वाचेन त्याला आधी चांदोबा हे मासिक वाचायला मिळेल. या अटीमुळे सर्वांनाच वाचनाची गोडी लागली होती. लताचा एक चुलत भाऊ, शाळेत एक वर्ष पुढे होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची सर्व क्रमिक पुस्तके लता वाचत असे. त्यामुळे तिचा पुढच्या वर्षीचा सर्व अभ्यास सुट्टीतच पूर्ण झालेला असे. नववी इयत्तेपर्यंत लताचे,असा आनंदी आणि समृद्ध अनुभव देणारे बालपण, संपन्न झाले होते. त्यावेळी ती पंधरा वर्षांची होती.
लताच्या आजोबांच्या आग्रहामुळे, लता नवव्या इयत्तेत असताना, श्री वाल्मिक गुठे यांच्याशी तिचा विवाह झाला आणि लताताई, सौ लता गुठे झाल्या. त्यावेळी श्री गुठे हे एम् ए – बी एड् परीक्षा उत्तीर्ण झाले होते. शिक्षकाचा पेक्षा स्वीकारला होता. लग्नानंतर चवथ्या-पाचव्या दिवशी परिक्षा दिली, वर्ष १९८४ मध्ये श्री गुठे पोलिस सबइन्स्पेक्टरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पत्र मिळाले आणि लगेचच श्री गुठे एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी नाशिकला रवाना झाले.
एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण करून श्री गुठे, मुंबईच्या पायधुणी पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाले. त्यांच्या पोलिस सबइन्स्पेक्टरच्या नोकरीची ही सुरुवात होती. कुर्ल्याच्या एका चाळीत, छोट्या खोलीत त्यांनी आपले बिऱ्हाड थाटले. लताताईंना मुंबईचे दर्शन प्रथमच झाले होते. निसर्गरम्य गावात मोठ्या वाड्यात राहणाऱ्या लताची सिमेंटच्या जंगलामध्ये एका छोट्याशा खोलीत घुसमट होत होती. वर्षभरातच त्यांना मरोळच्या पोलिस वसाहतीत सदनिका मिळाली आणि त्याच दरम्यान त्यांच्या मुलाचा जन्म झाला.
त्याच काळात श्री गुठे पोलिस अधिकाऱ्याची नोकरी सांभाळून एमपीएससीचा अभ्यास करून परीक्षा देत होते. कुटुंब जीवनात होणारे बदल याचा सराव झाल्यानंतर मुलगा तीन महिन्याचा असताना लताताईंनी साकिनाक्याच्या राम मनोहर लोहिया या नाइट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. दहावी – अकरावी – बारावी पर्यंतचा अभ्यास पूर्ण करून, लताताई बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याच वेळी श्री गुठे, MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांना सेल्स टॅक्स खात्यात प्रथम वर्ग अधिकाऱ्याची नोकरी मिळाली होती. नोकरी बदलल्यामुळे पोलिस वसाहतीतील जागा सोडून कुटुंबाने वरळीला मुक्काम हलवला होता. श्री गुठे यांच्या सेल्स टॅक्स खात्यातील अनेक सहकाऱ्यांचा शेजार वरळीच्या घरात लाभला. तिथे जेमतेम एक वर्ष राहिल्यानंतर श्री गुठे सेल्स टॅक्स अधिकारी असल्याने श्री गुठे यांना वांद्रे शासकीय वसाहतीत सदनिका मिळाली.

< सौ लता आणि श्री वाल्मीक गुठे
बारावी नंतर पुढील शिक्षणाची ओढ लागलेल्या लताताईंनी, वर्ष १९९१ मध्ये घराच्या जवळच असलेल्या चेतना महाविद्यालयात बी ए चा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. वर्ष १९९४ मध्ये त्या बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दहावी इयत्ता ते बी ए अशी लताताईंची झालेली शैक्षणिक प्रगती. दोन मुलांचा जन्म आणि चार वेळा बदललेली घरे..! अशा वर्ष १९८५ मध्ये मुंबईत आल्यानंतरच्या, गुठे दांपत्याच्या वेगाने घडणाऱ्या प्रगतीमधे आता थोडेसे स्थैर्य आले होते. मात्र दोघांनाही पुढच्या शिक्षणाची आंस लागलेली होतीच.
लताताईंना शिक्षक व्हायचे होते म्हणून त्यांनी बी एड करायचे ठरविले. बी एडला उल्हासनगरच्या नॅशनल कॉलेजात प्रवेश मिळाला. दोन्ही मुलं शाळेत शिकत होती. रोज पहाटे साडेचारला प्रत्येक दिवस सुरू होत असे. सर्वांचे डबे – मुलांची शाळेची तयारी करून मग वांद्रा मार्गे कुर्ला आणि पुढे उल्हासनगर असा दैनंदिन प्रवास सुरू झाल. बी एड् ची पदविका प्राप्त झाली आणि पुढे दोन वर्षे लताताईंनी शिक्षिकेची नोकरी केली. त्यात काळात मुंबई विद्यापीठातून डिस्टन्स एज्युकेशन माध्यमातून एम् ए पदवी प्राप्त केली. मुलांचा अभ्यास करून घेता घेता त्याही अभ्यास करत आणि प्रत्येक वर्षी एक परीक्षा पास व्हायची हा हट्ट त्यांनी स्वतःशीच धरला होता. जिद्दी लताताईंना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून द्यायची होती…!
दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊन दोघेही उच्च शिक्षण घेत होते. आता लताताईंनी स्वतःच्या कारकीर्दीच्या एका टप्प्यावर, शिक्षिकेची नोकरी सोडली आणि एका समविचारी मैत्रिणीबरोबर वर्ष १९९९ मध्ये वांद्रयात कोचिंग क्लास सुरू केले. नवीन काही शिकण्याची आंस इतकी तीव्र होती की त्यांनी शेअर मार्केटची तोंड ओळख याच काळात झाली.
लताताईंच्या वयाची चाळीशी गाठायच्या आधीच, वर्ष २००५ मध्ये गुठे कुटुंब विलेपारल्यात राहायला आले. वाचनाची लिखाणाची आवड होतीच. साहित्य आणि संस्कृतीच्या नगरीत विचारांना खाद्य मिळालं. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत होता. परंतु शोध थांबत नव्हता. लताताईंच्या शैक्षणिक आणि शिक्षक पेशातील कारकीर्दीचा आणि कुटुंब जीवनाचा विस्ताराने परिचय करून दिला त्याला काही निश्चित उद्देश आहे.
वर्ष २००७ नंतरच्या पंधरा वर्षांत प्रकाशिका म्हणून यशस्वी झालेल्या, विलेपारल्यातील एका धाडसी उद्योजिकेची ही पार्श्वभूमी आहे. शिक्षणाची न संपणारी आंस – सतत नाविन्याचा शोध – जीवनातली गतिमानता – चेतना – ऊर्जा – धाडस – वक्तशीर आणि नियमित दैनंदिन जीवनशैली – जिज्ञासा – उत्सुकता – निसर्गदत्त बुद्धिमत्ता – लोकसंग्रह – जनसंपर्क .. .. !.. लताताईंच्या वयाच्या चाळीशी पर्यन्तच्या कारकिर्दीच्या पार्श्वभूमीची ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. त्यांची सतत आणि नियमितपणे विकसित झालेली गुणवत्ता आहे…!
पंधराव्या वर्षी विवाह झाल्यावर, वैवाहिक कुटुंब जीवन सुरू करून चाळीशी पर्यन्तच्या पुढच्या पंचवीस वर्षांत झालेला या दांपत्याचा विकास आणि प्रगती अगदी आदर्श आहे. अलीकडच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचे, तर जणू या दांपत्याने विवाहप्रसंगी पुढच्या पंचवीस वर्षांचा रोड मॅप आखला होता आणि नेमक्या टप्प्यावरच्या आखलेल्या लॅंडमार्कना ते उभयता अगदी निष्ठेने स्पर्श करत राहिले.
स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा त्याची नेमकी जाणीव लताताईंना होती आणि आजही आहेच. बी एड् चा अभ्यास करतांना, दोन वर्षे कॉलेजला जातानाच्या कुर्ला – उल्हासनगर या प्रवासातील त्या एक तासाचा उपयोग त्यांनी लेखनाचा सराव करण्यासाठी केला. कथालेखन आणि कविता हा त्यांच्या आवडीचा लेखनप्रकार आहे. नंतरच्या काळातील एका यशस्वी कथालेखिका आणि कवयत्रीच्या कारकिर्दीची प्राथमिक जडणघडण अशी झाली होती. विलेपारल्यात राहायला आल्यानंतर, श्रीमती चारूशीला ओक आणि श्रीमती माधवी कुंटे यांच्या कथाकथन कार्यशाळेत आणि कथा क्लब मध्ये त्या सहभागी झाल्या. त्यांच्या गुणवत्तेतील हे दोन पैलू प्रकाशित झाले. विलेपारल्यातील नामवंत ग्रंथालयांच्या त्या सदस्य झाल्या. खरं सांगायचं तर विलेपारल्यात राहायला आल्यानंतरच्या काळांत, लेखक – साहित्यिक म्हणून वाचकांना त्यांचा परिचय झाला आहे. त्यांच्या उद्योग – व्यवसायाची सुरुवात आणि यातील त्यांची प्रगती खूप वेगाने झाली आहे.
वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती माधवीताई कुंटे आणि श्रीमती चारूशीला ओक यांचे मार्गदर्शन मिळाले आणि कथालेखिका आणि कवयत्रि म्हणून लताताईंचे लेखन प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. वाचक, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षकांनी याची नोंद घेतली. आपल्या लहानपणी आपल्याला वाचनाचा आनंद देणारी चांदोबा-चंपक-ठकठक अशी बालवाचकांसाठी गोष्टींची रंगीत पुस्तके आता प्रकाशित होत नाहीत याचे त्यांना दु:ख झाले. आपणच काही करायला हवे या जाणीवेतून त्यांनी बालवाचकांसाठी ‘चेरीलँड’ हे मासिक काढायचा निर्धार केला. त्याचवेळी त्यांचे ‘जीवनवेल’ हे पहिले पुस्तक चारचौघी मासिकातर्फे प्रकाशित झाले होते. डॉ सुनील सावंत त्यावेळी कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेचे अध्यक्ष होते. त्यांनी लताताईंची गुणवत्ता हेरली आणि त्यांना परिषदेचे सभासद करून घेतले. नंतरच्या काळांत त्या दादर शाखेच्या कार्यवाह झाल्या. माननीय ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या सल्ल्यानुसार कालांतराने त्यांनी को म सा प च्या विलेपारले शाखेची जबाबदारी स्वीकारली आणि ती शाखा पुन्हा कार्यरत झाली. आज लताताई, मुंबई जिल्ह्यातील को म सा प च्या नऊ शाखांच्या अध्यक्षपदावर आहेत.
^ भरारी प्रकाशन |
![]() ^ श्री यशवंत देव यांच्यासह |
या सगळ्या प्रवासात अनुभवी पत्रकार श्री अशोक शिंदे यांच्याशी परिचय झाला होता. चेरीलँड हे बालवाचकांसाठीचे मासिक काढायला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. वर्ष २०११ मध्ये मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत ‘चेरीलँड’ हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि मोठ्या वयाच्या वाचकांसाठी ‘ताऱ्यांचे जग’ या नावाने लताताईंचा पहीला दिवाळी अंक प्रकाशित झाला. त्यानंतर ज्येष्ठ ग्राफीक आर्टिस्ट श्री विजय तावडे यांच्या सहकार्याने ‘चेरीलँड’ मासकाचे नियमित प्रकाशन सुरू झाले. हा लताताईंच्या प्रकाशन व्यवसायाचा श्रीगणेशा होता. करोनाचा काळ वगळता, या दोन्ही मासिकांची दशकपूर्ती झाली आहे. येत्या दिवाळीत यांचे दहावे दिवाळी अंक प्रकाशित होतील. वर्ष २०११ च्या दरम्यान त्यांच्या कविता आणि गीतांना संगीतबद्ध करून त्याच्या दोन सीडी प्रकाशित झाल्या होत्या.
दोन्ही मासिकांच्या प्रकाशनाच्या अनुभवातून लताताईंना आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित केला. पुस्तक प्रकाशनाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. लेखक आणि प्रकाशक यांच्या नात्यात आणि व्यवहारात पारदर्शकता, विश्वास असावा आणि त्यात वाचकांचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपली जाणे आवश्यक असते. प्रकाशना संदर्भातील सुरुवातीच्या काही क्लेशकारक अनुभवांमुळे, आपण स्वतःच प्रकाशक व्हायला हवे अशी तीव्र जाणीव त्यांना झाली. त्यातूनच त्यांनी उचललेले हे पहिले पाऊल होते. कालांतराने त्यांनी वर्ष २०१६ मध्ये स्वतःचा ‘बिन भिंतीची शाळा’ हा बालकथा संग्रह प्रकाशित केला. याला त्या वर्षातील सात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. याच काळामध्ये ‘पुन्हा नव्याने’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला विविध संस्थांच्या सहा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. वर्ष २०१६-१७ मध्ये पुस्तके, दिवाळी अंक आणि प्रकाशन व्यवसाय याला एकूण २२ पुरस्कार मिळाले.
शिक्षक – लेखक – शेअर मार्केट उलाढालीच्या अभ्यासक लताताईंच्या साऱ्या व्यक्तिनिष्ठ (subjective) अनुभवाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वातिल वस्तुनिष्ठ (objective) उद्देशांचा विचार करता, कुठलीही पार्श्वभूमी नसतांना प्रकाशन व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा निर्णय, तर्कनिष्ठ – हेतुपूर्वक (logical & calculated) घेतलेला निर्णय होता याची जाणीव होते. त्यांच्या निसर्गदत्त चेतना – ऊर्जा आणि प्रतिभेची याला मिळालेली जोड, हा संयोग फक्त आणि फक्त यशस्वी होण्यासाठी आखलेला होता.
ज्येष्ठ कवयत्री-संपादिका माननीय श्रीमती शिरीषताई पै, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती गिरिजाताई किर आणि अन्य लेखक-साहित्यिकांनी लताताईंच्या प्रकाशित पुस्तकांची दखल घेतली. त्यातील विषयवस्तु – मांडणी – मुखपृष्ठ – भाषा शुद्धता – व्याकरण यासह पुस्तकाच्या दर्जेदार निर्मिती मूल्यांची दखल मुख्यता: घेतली गेली होती. त्या पुस्तकांतील साहित्यिक आणि वाङमयीन मूल्य, अनुभवी साहित्यिक आणि वाचकांना रुचीपूर्ण वाटली होती. शिरीषताई पै आणि गिरिजाताई कीर अशा साहित्यिकांनी आपली पुस्तके, प्रकाशनसाठी लताताईंना दिली होती. पुस्तकाच्या निर्मिती मूल्यांच्या दर्जाबरोबरच त्यांच्या विक्री आणि वितरण व्यवस्थेचाही अभ्यास करून त्यातही लताताई पारंगत झाल्या.

^ मराठी साहित्य मंडळ, सिंगापूर
विलेपारल्यात राहायला आल्यानंतर श्री गुठे यांनी आपली LL.B पदवी प्राप्त केली आणि सेल्स टॅक्स खात्यातील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपला GST सल्लागार असा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पुस्तकाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वीकृतीसाठी ISBN नोंदणी महत्वाची असते. याचा अभ्यास आणि कायदेशीर पूर्ततेसाठी श्री गुठे यांचे सहकार्य महत्वाचे होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लताताईंनी आपल्या दुसऱ्या एम् ए पदवीचा अभ्यास सुरू केला त्यातही त्या मराठी विषयात ७३ टक्के गुणांनी यशस्वी झाल्या.
वर्ष २०१९ अखेरपर्यंत भरारी प्रकाशन संस्थेची २०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथासंग्रह – कवितासंग्रह – प्रवास वर्णने – बालवाचकांसाठी विशेष पुस्तके अशी अन्य लेखकांची आणि स्वतःची पुस्तके यांत होती. लताताईंची स्वतःची वीस पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यामध्ये संत साहित्य ते बाल साहित्य अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. पांच देशांतील मराठी वाङमय आणि साहित्य मंडळांच्या संमेलनात आणि पुस्तक प्रदर्शनात, लताताई सहभागी झाल्या होत्या. परदेशात स्थायिक असलेल्या वाचकांची अनपेक्षित तरीही सुखद दाद, लताताईंच्या ‘मोहक युरोप’ या पुस्तकाला मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वाचकांची दाद त्यांना नियमित मिळत आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने प्रत्येक १५ ऑगस्टला क्रांतिकारकांवर त्या पुस्तकं प्रकाशित करतात. त्यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा मोठा प्रभाव असल्याने, खास मुलांसाठी अनेक अपरिचित क्रांतीकारकांची चरित्र त्यांनी नामवंत लेखकांकडून लिहून घेतली आणि प्रकाशित केली. सर्व वयोगटातील वाचकांसाठी लताताईंनी ऑडिओ बूक्सची निर्मिती केली आहे.
आणि मार्च २०२० मध्ये करोना विषाणूंच्या महामारीने आपल्या समाज – कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाला विळखा घातला. जणूकाही संपूर्ण देशाचे आणि जगाचेही व्यवहार थांबले. किमान पुढचे एक – दीड वर्ष, आपण सर्व आपापल्या घरांत जणू कैदी झालो होतो. या परिस्थितीचा योग्य वापर करण्याचे कसब , लताताईंकडे निसर्गत: होते. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी करोनाच्या कालखंडात अशी ई बूक म्हणजे ६५ डिजिटल पुस्तके प्रकाशित केली. जगभरातील मराठी वाचकांनी त्या पुस्तकांना दाद दिली, त्यांचे अभिप्राय आले. अमेरिकेतील काँग्रेस या ग्रंथालयात भरारी प्रकाशनच्या पुस्तकांचा समावेश झाला. किंडल – ऍमेझॉन – बूकगंगा अशा अनेक वेबसाईटवर ही डिजिटल पुस्तके ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाली. त्यातल्या यशस्वी पुस्तकांच्या छापील प्रतीही बनल्या. निरंतर नावीन्याचा शोध घेणाऱ्या या उद्योजिकेने करोना काळातही व्यस्त राहून, मोकळ्या वेळाचा असा विनियोग केला आहे.

^ ज्येष्ठ – श्रेष्ठ साहित्यिकांसह एका कार्यक्रमात
या सर्व व्यस्त कालखंडात लताताई नेहेमीच समाजाभिमुख राहिल्या आहेत. आजच्या घडीला, वाङमय आणि साहित्य क्षेत्रातील अनेक संस्थांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन त्या वेगवेगळ्या भूमिकांतून करत आहेत. युवा साहित्य प्रतिष्ठान या नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या त्या पदाधिकारी आहेत. वंजारी महिला समाज या संस्थेच्या मुंबई प्रदेशअध्यक्ष आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपारले शाखेच्या त्या कार्यवाह आहेत. ग्रंथालयाच्या वाचक वृद्धीसाठी नित्यनव्या संकल्पना आणि योजना त्या आखत आहेत.
हेवा वाटावा असा खूप मोठा लोकसंग्रह असलेल्या लताताई कायम हसतमुख असतात. नवनवीन कार्यक्रमात व्यस्त असतात. कुठल्याही क्षेत्रातील उद्योग – व्यवसाय करणाऱ्या तरुण-तरुणींनी, ‘जनसंपर्क कसा असावा’ याचा आदर्श म्हणून लताताईंच्या यशस्वी कारकीर्दीचा अभ्यास अवश्य करावा.
श्रीमती लताताई गुठे ही प्रकाशन व्यवसायातील यशस्वी उद्योजिका, विलेपारल्याच्या रहिवासी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यासह पती श्री वाल्मीक गुठे आणि अन्य कुटुंबीय आणि त्यांचे सर्व स्नेही-सुहृद या सर्वांना पुढील उपक्रमांसाठी शतशत शुभेच्छा..!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
–००–

