आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र २ – एप्रिल २०२२
श्री माधव परचुरे
आपण विलेपारले उपनगरला ‘मुंबई महानगराच्या हृदयावरचा कौस्तुभमणी’ असे संबोधित करतो, अगदी तसेच माननीय श्री बाबुराव परांजपे यांनी पासष्ट-सत्तर वर्षांपूर्वी वसवलेल्या सहकारी निवासी संकुलांना, आपण ‘विलेपारल्यातील सांस्कृतिक बेटं’ असे बहुमानाने संबोधित करतो. याला कारणही तसेच आहे.
या उपनगरातील प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकांची ओळख म्हणजे इथल्या समाजाचा आणि एकेका कुटुंबासह व्यक्तीचा सांस्कृतिक – शैक्षणिक – व्यवसाय आणि उद्योजकता यांचा परिचय आहे. या उपनगराच्या अशा भवतालाची मांडणी आणि मशागत, शतकापूर्वीपासून होते आहे. इथल्या समृद्ध मातीत रुजलेल्या प्रत्येकाची शैक्षणिक – सांस्कृतिक – व्यवसायिक – औद्योगिक प्रगती, तितकीच समृद्ध आणि संपन्न झाली आहे. ‘विलेपारल्यातील सांस्कृतिक बेटं’ म्हणजेच कोऑपेरेटीव सोसायट्यांची संकुलं.
श्री माधव परचुरे, विलेपारल्यातील अशाच रामानंदी सांस्कृतिक बेटावर रहातात. माधव पारले टिळक विद्यालयात पहिल्या-दुसऱ्या इयत्तेत असतांना, वर्ष १९५९ – ६० मध्ये माधवचे आई-वडील सुभाष रामानंद निवासी सहकारी संकुलात रहायला आले. विलेपारल्यातील या सर्व सोसायट्या, पारल्याची खास मध्यमवर्गी जीवनशैली जपणारी बेटं आहेत. इथली घरे आकाराने लहान असली तरी इथली कुटुंब अगदी टापटिपीने आपल्या दैनंदिन जीवनाची मांडणी करणारी आहेत. या कुटुंबातली प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक मुलगा, किमान दोन पदव्या धारण करंत असले – उत्तम नोकरी – व्यवसाय – उद्योग करणारे असले तरी त्यांच्या गरजा मापक आणि व्यवहारी आहेत. दर दोन-तीन कुटुंबामागे एक तरुण – तरुणी नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झाले आहेत.
वर्ष १९७० मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, तत्कालीन पारले कॉलेजची पहिली दोन वर्षे पूर्ण करून, बॅडमिंटन खेळातिल प्राविण्यासाठी माधवला रुपारेल कॉलेजात प्रवेश मिळाला आणि तिथेच त्याचा एम एस्सी पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यानंतर एमबीए पदवी प्राप्त करून माधव, बॉम्बे डाईंग या कापड उद्योगात, पहिल्या नोकरीवर रुजू झाला होता. ‘अनुभव हा सर्वोत्तम गुरु’ या विधानाचा योग्य आणि समर्पक अर्थ जाणून घ्यायचा असेल तर माधव परचुरेच्या कारकीर्दीचा आलेख तपासावा. बॉम्बे डाईंग ब्लिचिंग डेंपार्टमेंट, अडवानी ऑर्लीकॉन वेल्डिंग तंत्रज्ञान, माथेर अँड फ्लॅट पाण्याचे पंप, बेस्ट अँड क्रॉम्पटन इलेक्ट्रिकल उत्पादने….असा प्रवास आणि अशा विविध उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेचा अनुभव घेऊन, माधव वर्ष १९८० मध्ये एक्सेल इंडस्ट्री या कंपनीत रुजू झाला.
क्रॉप प्रोटेक्शन केमिकल्स अर्थात शेतीसाठी आवश्यक कीटकनाशक रसायने हे एक्सेल इंडस्ट्रीचे प्रमुख उत्पादन आहे. वर्ष १९९६ पर्यन्त पुढील पंधरा वर्षांत माधव या नोकरीत एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदापर्यन्त पोहोचला होता. आधीच्या अनुभवात भर पडली होती. आता त्याने पुन्हा नोकरी बदलली आणि तो पुढील तीन वर्षे बेल्जियममध्ये वास्तव्याला गेला. वर्ष २००० मध्ये वयाच्या पन्नाशिपर्यंत, माधव अनुभव समृद्ध झाला होता.
आता स्वतंत्र व्यवसायाच्या संकल्पना माधवला खुणावत होत्या. विविध उत्पादनांची विक्री व्यवस्था – प्रत्यक्ष निर्मिती – निर्यात व्यवस्था आणि परदेशातील उद्योग व्यवस्थापन अशा माधवच्या समृद्ध अनुभवाचा परिचय असलेल्या एका स्नेह्याने याच दरम्यान, डाएटरी सप्लिमेंट आणि न्यूट्रासिटिकल हेल्थ केअर – आरोग्य संवर्धक उत्पादने परदेशात निर्यात करण्यासाठी बनवशील का अशी विचारणा केली. आयुर्वेदाची डॉक्टर असलेली माधवची सहधर्मचारिणी डॉ सौ रश्मी हिच्याशी या व्यवसायाची आणि संकल्पनांची चर्चा करून वर्ष २००३ मध्ये त्याने आपले स्नेही श्री प्रफुल प्रधान यांच्या साथीने त्यांच्या भागीदारीत या निर्यात व्यवसायाचा श्रीगणेशा केला. मात्र या व्यवसायाची सुरुवात डॉ रश्मी यांनी वर्ष १९९४ मध्येच केली होती. आयुर्वेदिक सूत्र आणि सिद्धांताच्या अभ्यासाने बनवलेली शांपु आणि हेअर ऑइलची उत्पादने त्या परदेशांत निर्यात करंत असंत. माधवला नवीन उत्पादने डिझाईन करतांना, डॉ रश्मी यांचा अगदी प्राथमिक सल्ला फार मोलाचा असतो.

डॉ रश्मी आणि श्री माधव परचुरे
विलेपारल्याचे हे दोन उद्योजक आज डाएटरी सप्लिमेंट आणि न्यूट्रासिटिकल हेल्थ केअर – आरोग्य संवर्धक उत्पादनांची निर्मिती करतात. फिश ऑइल कॅपसुल्स – कोकोनट ऑइल कॅपसुल्स – गार्लिक ऑइल कॅपसुल्स – ओरीगॅनो ऑइल कॅपसुल्स – विटामीन ई कॅपसुल्स – मल्टिविटामीन + मिनरल कॅपसुल्स अशी यांची उत्पादने सुरुवातीला गोरेगाव आणि चेंबुर मधील दोन वेगळ्या कारखान्यात आउटसोर्स करून त्याची निर्मिती केली जात असे. मानवी आरोग्य संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या या सर्व उत्पादनांच्या प्रत्यक्ष निर्मिती आधी, त्यांचे डिझाईन करण्याच्या सफाईदार तंत्राचा अनुभव या दोघांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांना प्राप्त झाला होता. त्याशिवाय डॉ रश्मी यांचा सल्ला मिळत होताच. यामुळे या उत्पादनांची निर्मिती यंत्रणा निर्माण करण्याऐवजी या दोघांनी आउटसोर्सचा पर्याय वापरुन आपले लक्ष R & D वर केंद्रित केले. आज साधारण वीस प्रकारची आरोग्य संवर्धन औषधी स्वरूपाची उत्पादने चेन्नईतील दोन कारखान्यात आउटसोर्सकरून त्यांचे उत्पादन केले जाते.
कोकोनट ऑइल कॅपसुल |
फिश ऑइल कॅपसुल |
गार्लिक ऑइल कॅपसुल |
माधवकडे निर्यात व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनची मान्यता आणि GMP Good Manufacturing Practices या दोन्ही मान्यता या सर्व उत्पादनांना, गेली सहा वर्षे प्राप्त झाल्या आहेत. दर महिन्याला या उत्पादनांचे एक – दोन कंटेनर, अमेरिका आणि कॅनडा या देशांत निर्यात केले जातात.
![]() मल्टि विटामीन कॅपसुल |
![]() नॅचरल विटामीन कॅपसुल |
![]() लुटेन कॅपसुल |
पंचवीस कर्मचाऱ्यांसह दोन सुसज्ज ऑफिसातून, या चार कोटी रुपयांची वार्षिक निर्यात करणाऱ्या या उद्योगाच्या दैनंदिन व्यवहारांचे व्यवस्थापन केले जाते. जगभरातील हेल्थ केअर उत्पादनांचा अभ्यास – R & D माध्यमातून नव्या उत्पादनांची निर्मिती – उत्तम दर्जाचे सातत्य – आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकिंग – आयात करणाऱ्या देशांच्या नियम आणि कायद्यांचे काटेकोर पालन – नियमित आणि व्यक्तशीर पुरवठा आणि अर्थातच सजग आणि साक्षर अर्थव्यवस्थापन अशा उत्तम व्यवस्थापन कौशल्यामुळे Herbinn Micro Medicines या निर्यात उद्योगाची प्रगती वेगाने झाली आहे. माधव आणि भागीदार श्री प्रधान दोघेही या निर्यात उद्योगाचे व्यवस्थापन करतात. माधवची सहधर्मचारिणी डॉ रश्मी या BAMS पदवीधर आहेत आणि आयुर्वेद औषधांच्या सल्लागार आहेत. या हर्बल औषधांच्या प्राथमिक निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.
सर्व उत्पादनांचा परिचय करून देणारी, माहितीने परिपूर्ण आणि वाचनाचा उत्तम अनुभव देणारी वेबसाईट www.herbinns.com नेटवर उपलब्ध आहे. उद्योगाचा आणि उद्योजकांचा योग्य परिचय करून देणारी उत्तम वेबसाईट कशी असावी, त्याचा अनुभव घेण्यासाठी ही वेबसाईट नक्की पहावी.

श्री माधव परचुरे
डाएटरी सप्लिमेंट आणि न्यूट्रासिटिकल हेल्थ केअर – आरोग्य संवर्धक उत्पादनांची निर्मिती करण्याचे धाडस वयाच्या पन्नाशीनंतर करतांना सुरुवातीला R & D मध्येच बराच काळ गेला होता. त्यावेळी चिकाटीने आणि संयमाने या उद्योजकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा आत्मविश्वास याचे कौतुक करावे तितके थोडेच. आधुनिक काळातील Startup आणि Make In India या संकल्पनांसाठी ही उद्योगनीती आदर्श आहे.
डॉ रश्मी, श्री माधव परचुरे आणि श्री प्रफुल प्रधान यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि सर्व सहकाऱ्यांना अनेकानेक शुभेच्छा…!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section



