आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ३, मे २०२२.
श्री सुभाष पेठे : अनुभव अनुर्वाच्य धादांत
दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या काळात, विलेपारले उपनगराचा परिसर निसर्गसमृद्ध होता, शेती – बागायती आणि उत्तम हवामानासाठी मुंबईकरांमधे लोकप्रिय होता. तत्कालीन दक्षिण मुंबईतिल रहिवासी धनिकांनी या उपनगरात आपले समर व्हिला म्हणजे बंगले बांधले होते. आठवड्याच्या अखेरीस त्यांची कुटुंब, मुंबई शहराच्या उकड्यापासून दूर हवा पालटासाठी, या बंगल्यांत रहायला येत असंत. विसाव्या शतकातील विलेपारल्यातील यशस्वी व्यापारी, विजय स्टोअर्सचे संस्थापक – मालक श्री भाऊसाहेब साठे यांनी, टिळक मंदीरा शेजारी असलेला अशाच एका धनिकाचा ‘मनोहर निवास’ बंगला विकत घेतला होता. आता तिथे सोमनाथ सोसायटीची इमारत उभी आहे.
रेल्वेत नोकरी असणारे श्री कृष्णाजी पेठे यांनी आजच्या पार्क रोडवरील असाच एक रहाता छोटा बंगला, वर्ष १९४० मधे जुन्या मालकाकडून विकत घेतला होता. आपल्या वडिलांच्या स्मृतिचा सन्मान म्हणून त्यांनी बंगल्याचे नांव ‘पुरुषोत्तम निवास’ असे ठेवले होते. त्यांचे कुटुंब या बंगल्यात स्थायिक झाले होते. श्री कृष्णाजी पेठे यांच्या कुटुंबातील श्री सुभाष हे पहिले उद्योजक आहेत. या यशस्वी उद्योजकाचा परिचय, ‘विलेपारल्यातील आधुनिक उद्योजक’ या लेखमालेतील तिसऱ्या लेखांत आपण करून घेऊया.

< श्री सुभाष पेठे
पारले टिळक विद्यालयातून वर्ष १९६६ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन श्री सुभाष पेठे यांनी तत्कालीन पारले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एक वर्षांचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, वर्ष १९६७ मध्ये श्री सुभाष यांना , मुंबई आय् आय् टि मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळाला होता. या विषयाच्या अभ्यासक्रमाचे हे दुसरेच वर्ष होते त्यामुळे. वर्ष १९७०-७४ या काळांत विमानबांधणीचा भारतीय उद्योग प्रगतिशील अवस्थेत होता. मुंबई आय् आय् टि मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेलच याची खात्री आय् आय् टिच्या संचालकांना वाटत नव्हती. त्यामुळे वर्ष १९७२ मधील या अभ्यासक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील एक वर्षाचा अभ्यासक्रम दिला गेला होता. या सहाव्या वर्षातील अभ्यासक्रमाचा निश्चित फायदा श्री सुभाष यांच्या पुढील कारकिर्दीत झालेला दिसतो.
वर्ष १९७३ मध्ये श्री सुभाष यांनी मुंबई आय् आय् टि चा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसह मेकॅनिकल इंजिनियर असा सहा वर्षांचा पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला होता. कॉलेजमधील प्राध्यापकांनी श्री सुभाष यांच्या प्रगतीची नोंद घेतलीच होती. त्यामुळे परीक्षेचे अंतिम निकालपत्रक जाहीर होण्याआधीच प्राध्यापकांच्या शिफारसिने पुण्यातील वॉनसन इंजिनिअरिंग या उद्योगात नोकरीसाठी त्यांची निवड झाली होती. या उद्योगात बॉइलरची निर्मिती केली जात असे. सुरुवातीला श्री सुभाष यांनी आर् अँड डी डिपार्टमेंट मधे कामाला सुरुवात केली. काहीच काळांत पुण्यासह अहमदाबाद आणि सूरत येथील ग्राहकांच्या करखान्यातून बॉइलरची उभारणी करण्याच्या कामावर त्यांची नेमणूक झाली. नवीन अनुभव मिळणाऱ्या कुठल्याही कामाला नाही म्हणायचे नाही ही सुभाष यांची निसर्गदत्त प्रवृत्ती आहे. पहिल्याच नोकरीत, दूरच्या शहरांतील या सर्व जबाबदाऱ्या सहज यशस्वी झाल्या. त्या सर्व कामातील इंजिनिअरिंग कौशल्याबरोबरच, परचेस, इन्व्हेन्टरी, एच् आर डी अशा व्यवस्थापन कौशल्यप्राप्तीचा प्राथमिक अनुभव श्री सुभाषना समृद्ध करून गेली होता. वर्ष १९७३ ते ७८ अशी साधारण पांच वर्षांतील पहिलीच नोकरी अनुभव संपन्न करणारी होती.
विवाहाचा साखरपुडा झाला आणि आता मुंबईतच नोकरीचा शोध सुरू झाला होता.वर्ष १९७८ मध्ये श्री सुभाष आणि सौ श्रद्धा यांचा विवाह संपन्न झाला. पुढे वर्ष १९८२ पर्यंत दुसऱ्या कंपनीत नोकरी केली. वयाची तीशी पार झाली होती. सुरुवातीच्या दोन नोकऱ्यातील कारकीर्द यशस्वी झाली होतीच. मात्र त्याबरोबर व्यवसायाला आणि व्यवसायिकाला आवश्यक असा फार मोठा अनुभव प्राप्त झाला होता. हे अनुभव आणि आर्थिक भांडवलाच्या तरतुदीसह वर्ष १९८३ मध्ये दोन भागीदारांसह कन्सल्टेशन म्हणजे सल्लागार म्हणून आणि इंजिनिअरिंग उत्पादनांच्या मार्केटिंगचा आणि ट्रेडिंगचा व्यवसाय, श्री सुभाष यांनी चालू केला होता.
शीर्षकामध्ये श्री सुभाष पेठे यांच्या नावापुढे ‘अनुभव अनुर्वाच्य धादांत’ अशी रामदास स्वामींच्या दासबोधातील ओवीतील (४-४-११) शब्द रचना वापरली आहे. यांचा अर्थ ‘अनुभव शब्दाने न सांगण्यासारखा (अनुर्वाच्य) आणि प्रत्यक्ष (धादांत) असतो’. अनुभवसिद्ध श्री सुभाष पेठे यांच्या व्यवसाय अनुभवसिद्धीचा परिचय आपल्याला सहज व्हावा म्हणून दासबोधातील या ओवीतील तीन शब्दांचे नम्र प्रयोजन.

< सौ श्रद्धा आणि श्री सुभाष पेठे
एखाद्या व्यवसायिकाला त्याची आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर अनेक निर्णय घ्यावे लागतात. अशा निर्णय घेण्याच्या प्रत्येक क्षणी, Hidden persuader या संबोधनाची एक ऊर्जादायी छुपी किंवा अदृश्य शक्ति, आपल्या प्रत्येकाच्या साथीला सावली सारखी कायम वावरत असते. योग्य निर्णय प्रसंगी ही शक्ति प्रेरक असते तर चुकलेल्या निर्णयात तीच शक्ति कधी मारक ठरते. निर्णय घेण्यासाठी अशी प्रेरक शक्ति किंवा Hidden persuader बऱ्याचवेळा बाहेरची व्यक्ती असू शकते. पहिल्या नोकरीत शिफारस करणारे कॉलेजातील प्रोफेसर – मार्केटिंग आणि ट्रेडिंग व्यवसायातील भागीदार – आर्थिक अडचणीत असलेल्या उद्योगात आग्रहाने निमंत्रित करणारे परिचित, ही श्री सुभाष यांच्या व्यवसाय कारकीर्दीतील Hidden persuader च्या काही निवडक घटना.
मूलतः श्री सुभाष हे सौम्य वृत्तीचे, समंजस आणि शांत स्वभावाचे सज्जन गृहस्थ आहेत. व्यवसायातील आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक प्रामाणिक वृत्ती, कुटुंबीय-सहकारी-ग्राहक-कर्मचारी यांच्याशी विवेकशील निस्वार्थी सौजन्यपूर्ण व्यवहार, वक्तशीर आणि नियमित व्यवहार संतुलन, माणुसकी, अभ्यासवृत्ती, चिकाटी, आत्मविश्वास, समाजभान ही श्री सुभाष यांच्या व्यक्तिमत्वातिल बलस्थाने आहेत. मुख्य म्हणजे आपल्या या बलस्थानांचा योग्य आणि पूर्ण परिचय श्री सुभाषना आहे आणि आपल्या या क्षमतेवर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. या बरोबरच सहचारिणी सौ श्रद्धा यांचा भक्कम आधार आणि पाठिंबा याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या काळांत सहचारिणी सौ श्रद्धा नोकरी करत असल्याने त्यांनी कुटुंब कल्याणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली होती.
वर्ष १९८३ मधे स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यापासून पुढची पंधरा वर्षे फार कसोटीची होती. सहकार्यांचे – भागीदारांचे – ग्राहकांचे अयोग्य व्यवहार – सरकारी नियमातील बदल आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक तणाव आणि उत्पादन विषयक अडचणी अशा संकटांची मालिका सुरू झाली होती. यातून मार्ग काढतांना आपल्या क्षमतेवरील निस्सीम श्रद्धेने श्री सुभाष यांनी केलेले व्यवहार आणि घेतलेले निर्णय असा या पंधरा वर्षातील व्यवसायाचा ठळक परिचय होता. या काळातील एकेका संकटाचे वर्णन आणि त्यावर मात करण्यासाठी श्री सुभाष यांनी केलेल्या कुशल योजनेसाठी प्रत्येकी वेगळा लेखच लिहावा लागेल. एखाद्या तलवारबहाद्दर योध्याच्या कुशलतेने आपल्या बुद्धीचा – लेखणीचा वापर आणि सौम्य-शांत मुत्सद्देगिरी या अंगभूत गुणवत्तेनेच श्री सुभाष यांनी या प्रत्येक गंभीर परिस्थितीवर मात करत, पुढील प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले होते. या पंधरा वर्षातील आर्थिक आणि मानसिक तणावातून स्वतःचे शारीरिक आरोग्य आणि आपल्या स्वतःच्या Hidden persuader चे मानसिक आरोग्य संतुलीत ठेवतांना, श्रीमत् भगवतगीता श्री सुभाष यांना आधारभूत प्रेरक आणि मार्गदर्शक ऊर्जा होती, आजही आहे.
सुरुवातीच्या पंधरा वर्षांत व्यवसायात मनासारखे यश मिळाले नव्हते. खरे म्हणजे या परिस्थितिला ‘व्यवसायातील अपयश’ असेही म्हणता येणार नाही. वर्ष १९९८ मध्ये श्री सुभाष यांनी आपल्या पूर्ण स्वतंत्र व्यवसायाच्या मूलभूत पायाची बांधणी नव्याने सुरू केली होती. दुबईत स्थायिक असलेल्या एका व्यवसायिकासाठी इंजिनिअरिंग प्रोजेक्टसाठी आवश्यक यांत्रिक उत्पादनांची निर्यात सुरू केली. त्यातही अडचणी होत्याच. मात्र व्यवस्थापनाच्या दीर्घ अनुभवाने श्री सुभाषनी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला होता. या आंतरराष्ट्रीय निर्यात व्यापारची आर्थिक गणिते सांभाळणे हे कौशल्याचे काम आहे. हे आव्हानही श्री सुभाष यांनी सहज यशस्वी केले आहे.
एखादे धातूचे मशीन, तिचा पृष्ठभाग याची, दर सहा महिन्यांनी अथवा वर्षभराने निगा राखली जाते. दीर्घकाळ टिकाऊपणासाठी त्यावर रंग लावला जातो. यासाठी सुरुवातीला त्यावरील गंजासारख्या हानिकारक गोष्टी काढून पृष्ठभागाची एका विशेष पद्धतीने स्वच्छता केली जाते. धातूचा पृष्ठभाग असलेली भव्य आकाराची यंत्रे किंवा धातूचे पाइप अशा नव्याने बनवलेल्या प्रत्येक उत्पादनाला सुद्धा पृष्ठभागाच्या अशा स्वच्छतेची आवश्यकता असतेच, मगच त्यावर विशिष्ट रंग लावून त्याचा टिकाऊपणा वाढतो. अशा भव्य आकाराच्या पृष्ठभागाची स्वच्छता करण्यासाठी Shot Blasting हे तंत्र पद्धत वापरले जाते. ‘लोखंडाचे बारीक कंण वेगाने फेकून’ असा पृष्ठभाग स्वच्छ केला जातो. यासाठी वेगवेगळ्या पृष्ठभागासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छतेसाठी, वेगवेगळ्या प्रतीच्या यंत्रांची, श्री सुभाष यांच्या Redimacho Engineering P Ltd या कारखान्यात निर्मिती केली जाते. याबरोबरच अमेरिका आणि युरोपमधील उत्पादकांची, औद्योगिक स्वरूपाच्या रंगकामासाठि वेगळ्या प्रतीची यंत्रे आयात करून त्यांच्या विक्रीचे हक्क (एजन्सि) श्री सुभाष यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे.
वर्ष २००२ पासून निर्यात व्यवसाय आणि Shot Blasting मशीनरी उत्पादनाच्या उद्योगात आणि अमेरिकन – युरोपियन उत्पादनांच्या आयात व्यवसायांत वेगाने प्रगती झाली आहे. कारखाना आणि ऑफिसमधे पंचवीस-तीस कर्मचाऱ्यांसह श्री सुभाष यांनी ही प्रगती साध्य केली आहे. मोठा मुलगा श्री सौरभ आता वडिलांच्या व्यवसाय – उद्योगात सहभागी झाला आहे. धाकटा मुलगा श्री राहुल याने यशस्वी अभिनेता अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
मूळ ‘पुरुषोत्तम निवास’ या बंगल्याचा, गेल्या तीस वर्षातील दुसरा पुनर्बांधणी प्रकल्प वेगाने पूर्ण होतो आहे. वडिलांच्या पश्चात खूप तरुण वयांत श्री सुभाष यांनी कुटुंबप्रमुख ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आपल्या वडीलोपार्जित मालकीच्या जमिनीच्या विकास कामात, आपल्या वडिलांच्या सर्व बहिणी (आत्या) आणि स्वतःच्या आईसह बहिणींना श्री सुभाष यांनी सहभागी करून घेतले आहे, समाजातील नागरिकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. प्रसंगी श्री सुभाष आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारतील मात्र गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही वैरभावना धारण करणार नाहीत हा त्यांचा स्वभावधर्म आहे.
विलेपारल्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र आणि मराठी मित्र मंडळ या संस्थांच्या माध्यमातून, श्री सुभाष निर्व्याज वृत्तीने आपले समाजाभिमुख कार्य निरलसपणे सादर करत आहेत. ‘सुभाष’ या आपल्या मातृदत्त नावाप्रमाणे त्यांचाशी होणारा प्रत्येक संवाद सुसंवाद असतो.
श्री सुभाष पेठे, सौ श्रद्धा, श्री सौरभ, श्री राहुल आणि त्यांचे सर्व सुहृद आणि सहकारी यांना पुढील उपक्रमांसाठी शतशत शुभेच्छा…!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
