आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ६ , ऑगस्ट, २०२२
श्री विनोद जोशी तंदुरुस्त उद्योजक
सप्टेंबर, म्हणजे अगदी पुढच्या महिन्यात आपले श्री जोशी अडूसष्टावा जन्मदिवस साजरा करून एकूणसत्तराव्यात प्रवेश करतील. निसर्ग नियमाने आपले प्रत्येकाचेच वय वाढत असते हे खरेच. जोशींच्या जन्मदिवसाचा विशेष उल्लेख एवढ्याचसाठी, की वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पहिली अर्ध मॅरेथॉन (२१ की मि) धावलेल्या जोशींच्या, एव्हाना त्रेचाळीस अर्ध मॅरेथॉन धाऊन झाल्या आहेत. करोनाचा दोन वर्षांचा काळ वगळता, अकरा वर्षांत त्रेचाळीस अर्ध मॅरेथॉन. कुठल्याही वयाच्या ‘फिटनेस फ्रीक’ला आणि ज्येष्ठ नागरिकांना नक्की हेवा वाटेल अशी ही जोशींची तंदुरुस्ती.
वर्ष २०२२ मध्ये, आपला देश, स्वातंत्र्याचे पंचाहत्तरावे वर्ष अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. या संदर्भात ‘विलेपारल्यातील आधुनिक उद्योजक’ या आपल्या लेखमालेच्या शीर्षकातील ‘आधुनिक’ या विशेषणाविषयी थोडेसे. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळांत जन्माला आलेले आणि सामान्यतः व्यवसाय-उद्योग यातील कुठलीही फार मोठी पार्श्वभूमी नसलेले हे यशस्वी तरुण आणि तरुणी. शैक्षणिक पार्श्वभूमीसह कुशल व्यवस्थापन आणि व्यवसाय चातुर्य या निसर्गदत्त अशा गुणवत्ता, ऊर्जा आणि चेतना हे या सर्वांचे प्राथमिक भांडवल आहे.
रंग निर्मिती उद्योगातील आणि त्या क्षेत्रातील नामवंत उद्योजक श्री विनोद जोशी यांचा आज आपण विस्ताराने परिचय करून घेणार आहोत. श्री जोशी वर्ष १९७० मध्ये पारले टिळक विद्यालय या पारल्याच्या शाळेतून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन पारले कॉलेजातून त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये एम् एस्सी पदवी प्राप्त केली. त्यावेळी तरुण श्री जोशींसमोर दोन पर्याय होते. पुढील दोन वर्षे, डॉ नरगुंद या विद्वान ज्येष्ठ शिक्षकाच्या मार्गदर्शनाने Ph D चा अभ्यास करायचा. दुसरा पर्याय म्हणजे नोकरी शोधायची. भविष्यात आपल्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे अशी सुप्त चेतना त्या तरुण वयातच खुणावत होती. मात्र निश्चित अशी कुठलीही योजना धारण केली नव्हती. श्री जोशींनी दुसरा पर्याय निवडला आणि लगेचच प्रथम गुडलास नेरोलॅक आणि कालांतराने सिग्मा पेंटस् या रंग निर्मिती उद्योगात त्यांना नोकरी मिळाली.
स्वातंत्र्यानंतरच्या साधारण पंचवीस ते तीस वर्षांच्या काळांत, रंग निर्मिती क्षेत्रात बहुतांशी परदेशी उद्योगांचे प्राबल्य होते. आजही जगभरातल्या रंग निर्मिती क्षेत्रातील सर्वच आंतरराष्ट्रीय उद्योग भारतात कार्यरत आहेत. या रंग निर्मिती उद्योगात जसे फार मोठे आंतरराष्ट्रीय उद्योग (MNC) आहेत तसेच रंग निर्मिती करणारे छोटे उद्योगही (Small Scale) आहेत. वर्ष १९७९ मध्ये श्री विनोद जोशींना सिग्मा पेंटस् या कंपनीत नोकरी मिळाली. वर्ष १९८८ पर्यंत श्री जोशी या उद्योगाच्या सेवेत होते. तरुण वयातच श्री जोशी आपल्या स्वतःच्या उद्योगाची स्वप्ने पहात होते. नोकरीत असतानाच वर्ष १९८०/८२ मध्ये श्री जोशींचे उद्योगधारणेचे पहिले पाऊल पुढे पडले. वसई इंडस्ट्रियल इस्टेट या वसईतील नियोजित उद्योग क्षेत्रात त्यांनी दहा हजार चौरस फूट कारखान्याच्या जमीनिसाठी नोंदणी अर्ज केला.
इमारती आणि घरांच्या अंतर्गत सजावटीचे रंग – डेकोरेटीव्ह पेंटस्. स्टील कपाटे-खुर्च्या-सीलिंग फॅन-मोटारी अशा उत्पादनांसाठी वापरले जाणारे – इंडस्ट्रियल पेंटस्. वस्तूच्या टिकाऊपणासाठि वापरले जाणारे – प्रोटेक्टीव्ह पेंटस्. ढोबळमानाने रंग उद्योगात या तीन प्रकारच्या रंगांचे उत्पादन केले जाते. मात्र गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे पावडर कोटींग – स्प्रे पेंटिंग बूथ अशा रंग वापरण्याच्या नव्या संकल्पना वेगाने स्वीकारल्या गेल्या. याच वेगाने रंग उद्योगात, रंग निर्मितीच्या यंत्रांचे आणि तंत्रांचे बदल होत गेले. मात्र या आणि अशा बदलांची चाहूल, श्री विनोद जोशी यांना खूप आधी लागली होती. भारतातील Small Scale Paint Manufacturers Association तर्फे सदस्यांकडून रंग निर्मिती आणि अंतिम वापर या संदर्भात Innovative Technology या विषयांत शोध निबंध मागवण्यात आले होते. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या कार्यक्रमात, वर्ष १९८० – १९८२ – १९८४ अशी पुढची सलग तीन वर्षे, श्री जोशींच्या निबंधाला सुवर्णपदकाने सन्मानित केले गेले होते. हे सर्व पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपति यांच्या हस्ते श्री जोशींनी स्वीकारले होते. स्वतःची कंपनी चालू केल्यानंतर श्री. जोशी यांनी मुंबई विद्यापीठामध्ये पेंट टेकनॉलॉजि हा विषय शिकविण्यास सुरुवात केली. छोट्या रंग उत्पादकांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी स्मॉल स्केल पेंट मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे काम करण्यास सुरुवात केली. रंग निर्मिती आणि त्याचा वापर या क्षेत्रातील ज्येष्ठ तंत्रज्ञ म्हणून कीर्तिमान झालेले श्री विनोद जोशी, कालांतराने या असोसिएशनचे प्रेसिडेंट झाले. आजही भारतातील छोट्या रंग उत्पादकांना ते नेहमीच विनापेक्ष मार्गदर्शन करीत असतात. असोसिएशनच्या नियतकालिकात रंग निर्मिती आणि वापर तंत्रज्ञानासंदर्भात त्यांचे लेखही प्रकाशित होतात.
^ उपराष्ट्रपती श्री हिदायतुल्ला पुरस्कार १९८२ |
^ राष्ट्रपति झैलसिंग पुरस्कार १९८४ |
श्री गजानन दत्तात्रय जोशी, हे श्री विनोद जोशींचे वडील, एल् आय् सी चे एजंट होते आणि गुंतवणूक विषयांत अन्य व्यवसाय करत असंत. हे नेमस्त म्हणजे फार नेमाने वागणारे गृहस्थ, नियमितपणा आणि वक्तशीर व्यवहारात आदर्श मानले जात असंत. आपल्या वडिलांच्या आदर्शांचा वारसा श्री विनोद जोशी यांनी आपल्या प्रत्येक व्यवहारात जपला आहे. त्याचा एक संदर्भ असा की ते दहा वर्षे नोकरी करत होते त्या सिग्मा पेंटस् कंपनीत, इंडस्ट्रियल पेंटस् बनवला जात असे. स्वतःचा उद्योग सुरू केल्यावर, आपण इंडस्ट्रियल पेंटस् बनवायचा नाही तर इतर प्रतीचे रंग बनवायचे, हे सौजन्य श्री विनोद जोशींनी तितक्याच नेमस्तपणे जपले आहे. या सौजन्यात, त्यांचा आपल्या क्षमतेवरचा विश्वास आणि आत्मगौरव याचा परिचय आपल्याला निश्चितच होतो.
तरुण वयापासून जपलेले व्यवसाय-उद्योगाचे स्वप्न, वर्ष १९८८ मध्ये वास्तवात साकार झाले. वसई औद्योगिक वसाहतीत घेतलेली जागा ताब्यात आली आणि कारखान्याची वास्तु उभी राहिली. सिग्मा पेंटस् मधील नोकरीचा राजीनामा देऊन श्री जोशींनी आपले लक्ष गॅलॅक्सी कोटींग इंडस्ट्रीज या आपल्या कारखान्यावर केंद्रित केले.
रंग निर्मिती उद्योगाच्या प्रगतीचा आणि व्यवहारांचा पूर्ण अभ्यास हे श्री जोशींच्या व्यवस्थापन कौशल्याचे वैशिष्ट्य होते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या काळांत, भारतीय रंग उद्योगाची प्रगती वेगाने होत होती मात्र पुरवठ्याची मागणी इतकी होती की मोठ्या रंग उद्योगांची उत्पादन क्षमता कमी पडत होती. अशा मोठ्या उत्पादकांच्या डेकोरेटीव्ह रंगांची निर्मिती श्री जोशींनी आपल्या कारखान्यात सुरू केली. स्वतः अनुभवी रंग तंत्रज्ञ असल्याने अशा रंगाची निर्मिती त्यांच्यासाठी सहज साध्य होती. मोठ्या रंग उत्पादकांच्या दर्जेदार मालाचे उत्पादन करणारे Ancillary Unit म्हणून गॅलॅक्सी कोटींग इंडस्ट्रीज या उद्योगाची वेगाने प्रगती झाली.
![]() ^ गॅलॅक्सी कोटींग इंडस्ट्रीज |
![]() ^ गॅलॅक्सी कोटींग इंडस्ट्रीज |
श्री विनोद जोशींनी या प्रगतीच्या काळात त्यांच्या तंत्र कौशल्याबरोबरच व्यवस्थापन कौशल्याने दोन ध्येय साध्य केली होती. आपण ठरवल्यानुसार सिग्मा पेंटस् सारखे इंडस्ट्रियल पेंटस् बनवायचे नाहीत. आणि दुसरे ध्येय आपल्या रंगांच्या विक्री व्यवस्थेपेक्षा, रंग निर्मितीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे. कुठल्याही रंग उद्योगाला आपली स्वतःची विक्री व्यवस्था असणे आवश्यक असते. एशियन पेंटस् मोठ्या उद्योगांचे Ancillary Unit म्हणजे पूरक उत्पादक म्हणून व्यवसाय प्रगत झाल्यामुळे श्री जोशींना स्वतःची विक्री व्यवस्था असण्याची आवश्यकता नव्हती आणि आजही नाही.
निव्वळ दहा हजार चौरस फूट जागेवर वर्ष १९८८ मध्ये सुरू झालेला गॅलॅक्सी पेंटस् हा उद्योग, पुढच्या पंधरा वर्षांत आता चाळीस हजार चौरस फूट म्हणजे एक एकर जागेवर विस्तारला आहे. आधुनिक रंग निर्मितीच्या यंत्रांनी सुसज्ज अशा कारखान्यात पंधरा तंत्रज्ञ आणि पांच ऑफिस कर्मचारी काम करतात. श्री विनोद जोशी आजही पूर्णवेळ या उद्योगाचे दैनंदिन व्यवस्थापन करतात. सौ सुषमा जोशी, उद्योगाचे दैनंदिन आर्थिक आणि बँक व्यवहार नियंत्रित करतात. श्री जोशींची मुलगी सौ अमृता जोशी हिने यु डी सी टि या शिक्षण संस्थेतून पेंट टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. आता ती शॉप फ्लोअरवर रंगांच्या प्रत्यक्ष निर्मितीचे व्यवस्थापन पहाते आहे.

^ श्री विनोद सौ सुषमा जावई श्री मिथेश मुलगी सौ अमृता जोशी
विलेपारल्यात राहाणारे श्री जोशी आजही वसई पर्यंतचा दैनंदिन प्रवास रेल्वेने करतात. मात्र या यशस्वी उद्योजकाचा परिचय इथे संपत नाही. वर्ष १९८० मध्ये श्री जोशी, योग विद्या निकेतन या संस्थेच्या योगाचार्य माननीय पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजी यांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाने योगसाधनेचा नियमित अभ्यास सुरू झाला. गेली बेचाळीस वर्षे हा अभ्यास अखंडित सुरू आहे. आता योग विद्या निकेतन संस्थेचे विश्वस्त असलेले श्री जोशी, आठवड्यातून एक दिवस संस्थेच्या नवी मुंबईतील कार्यालयात, साधकांच्या योगसाधना विषयक समस्यांचे निवारण करतात. मुंबईतील अनेक डॉक्टर आपले रुग्ण या योग विद्या निकेतनमध्ये, आरोग्यविषयक योग्य सल्ला मिळेल या खात्रीने पाठवतात.
![]() ^ श्री विनोद जोशी |
![]() ^ माननीय राष्ट्रपतींच्याहस्ते सन्मान पद्मश्री निंबाळकर गुरुजीं समवेत श्री जोशी |
या सगळ्या व्यस्त काळातच श्री विनोद जोशींनी तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासात एम् ए ही पदवी प्राप्त केली आहे. आता श्रीमद् भागवतगीतेचा नियमित अभ्यास सुरू आहे. योग विद्या निकेतन संस्थेच्या योगवार्ता या नियतकालिकात, योगविद्या आणि सांख्य तत्वज्ञान या त्यांच्या अभ्यासाचे लेख प्रकाशित होतात. श्री. निंबाळकर गुरुजींबरोबर योग विद्या निकेतन मध्ये काम करीत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा माननीय राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपती भवन येथे आमंत्रण देऊन २००२ साली सत्कार केला होता. श्री. विनोद जोशी या कार्यक्रमात आमंत्रित होते.
या लेखाच्या सुरुवातीला, गेल्या दहा-बारा वर्षातील श्री जोशींच्या ४३ अर्ध मॅरेथॉन सहभागाचा उल्लेख केला आहे. मुलगी सौ अमृता आणि जावई श्री मिथेश यांच्यासह ते मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात. गेली अनेक वर्षे श्री विनोद जोशींनी ट्रेकिंगचा छंद जपला आहे. सात दिवसांत शिवरायांच्या सिंहगड ते रायगड असा ट्रेक या बरोबरच सह्याद्री डोंगररांगा आणि हिमालयात सतरा हजार फूट ऊंची पर्यंत, कुटुंबियांसमवेत ट्रेकिंगचा आनंद घेणे, हे सर्व व्यापातून त्यांच्यासाठी हक्काचे विरंगुळ्याचे क्षण असतात.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पार्ले स्मृती सुगंध’ या स्मृती ग्रंथात, श्री. विनोद जोशी यांच्या या सर्व कार्याचा उल्लेख करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
उद्योग व्यवस्थापना बरोबरच इतके समाजाभिमुख राहून त्याचवेळी आपले आनंदाचे छंद जपणाऱ्या, वक्तशीर – नियमित – शिस्तबद्ध दिनक्रम असणाऱ्या या कर्तृत्ववान आणि यशस्वी, श्री विनोद जोशी या विलेपारल्यातील आधुनिक उद्योजकाने उद्यमशीलतेचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यासह सहचारिणी सौ सुषमा जोशी, मुलगी सौ अमृता जोशी आणि उद्योगातील सहकारी-कर्मचारी यांना शतशत शुभेच्छा..!!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
–००–




