आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ८ , ऑक्टोबर २०२२
श्री मुकेश शिपुरकर : विलेपारल्याचा बिल गेट्स.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण पार्लेकर विविध मार्गांनी साजरा करत आहोत. ‘आम्ही पार्लेकर’ मासिकाच्या parlebazaar.com या ब्लॉगवर याच निमित्ताने ‘विलेपारल्यातील आधुनिक उद्योजक’ ही लेखमाला सध्या प्रकाशित होते आहे. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले हे सर्व आधुनिक व्यवसाय – उद्योजक, आपल्या विलेपारले उपनगराचे रहिवासी आहेत. उद्योग – व्यवसायाची कुठलीही कुटुंब पार्श्वभूमी नसतांना, आपल्या स्वतःच्या संकल्पना आणि व्यवस्थापन कौशल्याने, हे सर्व तरुण महिला आणि पुरुष उद्योजक, यशस्वी झाले आहे. या लेखमालेच्या माध्यमातून या आधुनिक उद्योजकांचा परिचय वाचकांना होतो आहे.
वर्ष १९०७ ते वर्ष १९८२ या पंच्याहत्तर वर्षांचा, विलेपारले उपनगराचा, विस्ताराने लिहिलेला इतिहास आणि व्यक्ति परिचय, या ग्रंथाचे प्रकाशन प्रा गंगाधर गाडगीळ याच्या हस्ते वर्ष १९८६ मध्ये झाले होते. त्यावेळी केलेल्या भाषणांत त्यांनी विलेपारले उपनगर आणि तिथल्या रहिवासी नागरिकांच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण केले होते. याचा जाणीवपूर्वक उल्लेख इथे होणे आवश्यक आहे.
प्रा गाडगीळ त्यावेळी म्हणाले होते …“विलेपारले हे मुंबईचे उपनगर खरे, पण त्याबरोबरच अनेक वर्षे ते एक छोटेसे गावही होते. मुंबईचे अनेक गुण पारलेकरांच्या रक्तात कळत न कळत मुरले होते. मुंबईकरांची उपक्रमशीलता देखील पारलेकरांत विपुल प्रमाणात होती. त्यातल्या अनेकांनी आपले स्वतंत्र व्यवसाय सुरू केले, कारखाने उभारले, व्यापार सुरू केला आणि वाढविला. आधुनिक विद्या आणि तंत्रज्ञान त्यांनी हस्तगत केले. जुन्याचा अभिमान बाळगला, नव्या उपयुक्त आणि हितकारक गोष्टींचा स्वीकार केला आणि जुन्या नव्याचा खास पारलेकरी पद्धतीने मेळ घातला. मुंबईला भूषणवाह वाटावे, तिच्या संपन्नतेत भर घालणारे असे पुष्कळ निर्माण केले”…!
< श्री मुकेश शिपुरकर
श्री मुकेश शरद शिपुरकर या विलेपारल्यातील अशाच एका चतुर आणि धाडसी उद्योजकाचा परिचय, या लेखातून वाचकांना होतो आहे. या परिचय लेखाच्या शीर्षकात ‘विलेपारल्याचा बिल गेट्स’ असे संबोधन सन्मानपूर्वक वापरले आहे. त्याची पार्श्वभूमी तशीच खास आहे.
सौ गीता आणि श्री शरद शिपुरकर या श्रद्धावान – भक्तिमार्गी दांपत्याच्या पोटी वर्ष १९६८ मध्ये मुकेशचा जन्म झाला. विलेपारल्यात दोन खोल्यांच्या घरांत आनंदाने राहाणाऱ्य या कुटुंबातील दोन बहीणींच्या नंतरचा मुकेश हा घरातले शेंडेफळ, आई-वडील आणि मोठ्या बहीणींचा लाडका भाऊ. त्याकाळांत विलेपारल्यात सर्वच मध्यमवर्गी मराठी कुटुंब, अडीचशे किंवा फार तर साडेतीनशे चौरस फुटाच्या घरांत सुखाने राहात असंत. नैमित्तिक कामासाठी मुंबईत येणाऱ्या नात्यातील पै – पाहुण्यांचा पाहुणचार आनंदाने आणि आपुलकीने केला जात असे. शिक्षणासाठी मुंबईत येऊन राहाणाऱ्य किशोर-किशोरीनां आस्थेने कुटुंबात स्वीकारले जात असे. काका – मामा – आत्या – मावशी अशा सर्वांची काळजी घेतली जात असे. तत्कालीन विलेपारल्यातील समाज आणि कुटुंब संस्कृती, अशी समृद्ध होती. आज मुकेशच्या व्यक्तिमत्वावर, या समृद्ध कुटुंब संस्कृतीचा प्रभाव किती स्वाभाविक आहे, याची जाणीव, त्याच्या प्रगतीचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव घेतल्यावर निश्चितपणे होते. मुकेशचे वडील श्री शरदराव शिपुरकर, सेंट्रल एक्साइज मध्ये असिस्टंट कामिशनर म्हणून निवृत्त झाले होते. आणि सौ गीता मुंबई महापालिकेत शिक्षण खात्यात उच्च अधिकारी होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांना दोन वेळा महापौर पुरस्काराने सन्मानित केले होते.

< श्री मुकेश शिपुरकर
स्वतःच्या प्रयत्नाने सुरू केलेल्या व्यवसाय – उद्योगात यशस्वी झालेल्या तरुण – तरुणींची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप महत्वाची असते. शालांत परीक्षेनंतर मुकेशने डहाणूकर महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला. त्याचवेळी त्याला लष्करी शिक्षणाची संधी मिळाली. कॉमर्स शिक्षण सोडून तो नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाला. कौटुंबिक कारणांमुळे त्याला भोसला मिलिटरी स्कूल मधले शिक्षण अर्धवट सोडून विलेपारल्याला घरी परत यावे लागले होते. आता योग्य ते शिक्षण घेणे आवश्यक होते. कोकण भवनमधल्या भारती विद्यापीठ या कॉलेजात इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा डिप्लोमा आणि भगूभाई मफतलाल पॉलीटेक्निक मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असे दोन डिप्लोमा वर्ष १९८९ मधे पूर्ण झाले, आणि मुकेशचा नोकरीसाठी शोध सुरू झाला. आपल्या मुलाने नोकरी करावी असा वडिलांचा आग्रह होता. कालांतराने वर्ष १९९९ मध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील पदवी प्राप्त झाली होती.
वडिलांच्या परिचयातून, त्याकाळी टीव्ही सेट बनवणाऱ्या सोनी ऑरसन या कंपनीत त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर काही काळ सिस्टॉनिक कंपनीत अनुभव मिळाला. मात्र याच काळांत ‘मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे’ ही नैसर्गिक उर्मी शांत बसू देत नव्हती. उमेश सावंत या मित्राच्या साथीने मुकेशने आयसी – कपॅसिटर अशी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मधील अगदी प्राथमिक साधने बनवायला आणि विकायला सुरुवात केली. बावीसशे रुपये मूल्याचा पहिल्या ऑर्डरचा माल बनवून वेळेत पुरवठा करतांना निव्वळ एक हजार रुपये उभे करणे यापासून अन्य अडचणींचा सामना करावा लागला होतं. त्यातून दोनशे रुपयांच्या कमाई बरोबरच झालेली अनुभवाची कमाई अमूल्य होती. ‘विलेपारल्याच्या बिल गेट्स’च्या व्यवसायाचे वर्ष १९८९ मधले हे पहिले पाऊल होते.
आता अशा छोट्या कामांच्या पलीकडे असलेली आव्हाने खुणावत होती. इंजिनियरिंगचे दोन डिप्लोमा झाले होते. वर्ष १९८५ – ९० च्या सुमारास कॉम्प्युटर म्हणजे पीसी चे आगमन झाले होते. मात्र त्या काळांत मोठ्या ब्रॅंडच्या पीसी च्या किमती सामान्यांच्या आवाक्यात नव्हत्या. या परिस्थितीत मुकेशने स्वतः पहीला पीसी बनवला होता. त्याची किंमत मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडच्या पीसी च्या किमतीपेक्षा जवळपास अर्ध्याने कमी होती. श्री एन् बी देसाई हे चार्टर्ड अकाउंटंट वडिलांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ऑफिसमध्ये पहीला पीसी दिला गेला होता. इथेच ‘शार्गी कॉम्प्युटर्स’ या श्री मुकेश शिपुरकर यांच्या व्यवसायाचा जन्म झाला होता. वडीलांचे नांव शरद आणि आईचे नांव गीता यातून ‘शार्गी’ (SHAR+GEE) या नावाची निर्मिती झाली आहे. वर्ष १९८९ ते ९३ ही चार वर्ष, स्वतः पीसी बनवणे – स्वतः डिलिव्हरी देणे – स्वतः नव्या ग्राहकांशी बोलणे – स्वतः वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे असा मुकेशचा दिनक्रम होता. दिवसाचे चोवीस तास कमी पडत होते.

< श्री मुकेश शिपुरकर
वर्ष १९९५ मध्ये मुकेश आणि सौ नम्रता विवाहबद्ध झाले आणि आता कुटुंब कल्याणाची जबाबदारी वाढली होती. वर्षे १९९६ उषा निकेतन मध्ये मुकेशने पहिली जागा विकत घेतली होती. महंत रोडवरच्या मसुरेकर चौकातील उषा निकेतन या चाळवजा इमारतीशी मुकेशचे विशेष नाते आहे. याच चाळीत त्याच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला होता. आज नव्याने विकसित झालेल्या या इमारतीत त्याच्या मालकीच्या काही जागा आहेत. नोकरीच कर असा आग्रह जरी वडिलांनी धरला असला तरी वर्ष १९८९ पासूनच्या दहा वर्षांत मुकेशच्या व्यवसायाचा आणि प्रगतीचा त्यांना अभिमान होता. आपल्या प्रत्येक निर्णयात साथ देणाऱ्या आई आणि वडील याच्याप्रति मुकेशचे विशेष भावनिक नाते होते. वर्ष २००१ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

< सौ नम्रता आणि श्री मुकेश शिपुरकर आणि नातू
शार्गी कॉम्प्युटर्सच्या पीसी निर्मितीच्या विस्तारलेल्या व्यवसायाला, वर्ष १९९३ पासून, इंटेल – मायक्रोसॉफ्ट – एपसन – आयबीएम – कॉमपॅक – सोनी – एचपी – समसंग अशा पंधरा कॉम्प्युटर हार्डवेअर निर्मात्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची डीलरशिप मिळाली होती. त्यामागोमाग इन्फिनोवा – गोदरेज – बॉश – पॅनासॉनिक अशा सीसीटीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी प्रॉडक्ट निर्मात्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची डीलरशिपही मिळाली. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दहा वर्षांत या साधनांचा प्रचार आणि प्रसार वेगाने झाला होता. प्रथम एक पीसी बनवून चिकाटीने प्रगती करत, शार्गी कॉम्प्युटरने या उद्योगात निव्वळ दहा-बारा वर्षांत आपला दबदबा निर्माण केला आहे. आजपर्यंत दहा हजारांच्या वर पीसी ची निर्मिती आणि पुरवठा झाला आहे. पुढील दहा-बारा वर्षांत सीसी टीव्ही पुरवठादार म्हणून व्यवसायाचे शिखर गाठले आहे. या सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दिलेल्या असंख्य परफॉर्मन्स अवॉर्डनी ऑफिसच्या सर्व भिंती भरून गेल्या आहेत.‘विलेपारल्याचा बिल गेट्स’ असे संबोधित करण्याचा हाच नेमका उद्देश आहे. ग्रीन हाऊसच्या व्यवसायाचा विस्तार, शार्गी कॉम्प्युटरच्या याच मजबूत आर्थिक पायावर कालांतराने झाला आहे.
वर्ष २००५ – ०६ पर्यंत शार्गी कॉम्प्युटरच्या आणि श्री मुकेश शिपुरकरांच्या व्यवसाय वृद्धीबरोबरच, यशस्वी उद्योजक म्हणून पसंती आणि प्रसिद्धी मिळवली होती. व्यक्तशीर आणि नियमित, उत्तम सेवेसाठी राज्य सरकारतर्फे गौरव पुरस्कारही प्राप्त झाले होते. मंत्रालय, हायकोर्ट, स्टॉक एक्स्चेंज याबरोबरच आता मुंबई पोलिस – महाराष्ट्र पोलिस – जम्मू काश्मीर पोलिस, ठाणे पोलिस, रेल्वे पोलिस, आर्मी हेडक्वार्टर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, सेल्स टॅक्स कार्यालये, अनेक व्यवसाय कार्यालये अशी सीसी टीव्ही यंत्रणा पुरवठ्याची ग्राहकांची यादी नियमितपणे वाढत राहिली. विलेपारल्यातील नागरिकांनी आपल्या व्यवसायाला दिलेल्या प्रतिसाद आणि पाठिंब्याचा सन्मान म्हणून शार्गीतर्फे विलेपारल्यात विनामूल्य सीसी टीव्ही यंत्रणा बसवली गेली. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
वर्ष २००४ ते २०१४ या काळात मुकेशरावांच्या शार्गी कॉम्प्युटर्स आणि शार्गी सिस्टिम्स प्रा लिमिटेड या दोन व्यवसाय उद्योगांची वाढ वेगाने झाली होती. पीसी निर्मिती आणि सीसी टीव्ही यंत्रणांचे पुरवठादार म्हणून ग्राहक मान्यता मिळाली होती. या प्रगतीमध्ये मुकेशरावांच्या व्यवस्थापन कौशल्यातील गुणवत्ता स्पष्टपणे अधोरेखित होतात. यशस्वी उद्योजकांची ओळख त्यांच्या धाडस – चातुर्य – निरंतर परिश्रम – दूरदृष्टी अशा गुणांमुळे होते. मुकेशरावांच्या व्यक्तिमत्वात हे सर्व गुण निसर्गदत्त आहेत. मात्र संशोधन वृत्ती – आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांवर संपूर्ण विश्वास आणि लोकसंग्रह या मुकेशरावांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू आहेत.
श्रीमती सोनाली शहा – श्री सुनील गोरुले यांच्यासह अनेक कर्मचारी त्यांच्या बरोबर गेली पंचवीस वर्षे काम करतात. मुकेशराव त्यांना कर्मचारी नव्हे तर सहकारी मानतात. व्यवसायाच्या सुरुवातीपासून आजपर्यन्तच्या प्रगतीचे ते साक्षीदार आहेत. रिसेप्शनिस्ट – ड्रायव्हर – शिपाई अशी कामाला सुरुवात करणाऱ्या यातल्या अनेकांनी आज, शार्गीच्या विस्तारलेल्या उद्योगात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मुकेशरावांप्रति त्यांनी वडीलबंधुचे नाते जपले आहे. थेट मुख्यमंत्री – मंत्री – आमदार – नगरसेवक – पोलिस कमीशनर अशा पदावरील व्यक्ति असोत – नामवंत कलाकार असोत अथवा प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी असोत, अशा सर्व थरातील नागरिकांशी असलेला मुकेशरावांचा जनसंग्रह आपल्याला अचंबित करतो.
आपल्या पीसी मध्ये वापरायचे छोटे स्क्रू असो अथवा सीसी टीव्ही चे उपकरण असो – टी ब्रेक या टी लौंजच्या व्यवसायाची नव्याने सुरुवात असो – लोणावळ्यातील बंगल्यांची सजावट असो – कोल्हापूर जवळील आंबोलि घाटात घेतलेल्या जागेतील गाई असोत – नाटक – मालिका – चित्रपट निर्मिती असो – अगदी नव्याने विकत घेतलेल्या आणि नुकत्याच वेगळ्या जागेत स्थलांतरित झालेल्या ग्रीन हाऊस या हॉटेलचा व्यवसाय आसो..!..प्रत्येक गोष्टीचा – कायद्याचा – कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा – प्रेक्षकांच्या आणि ग्राहकांच्या रुचीचा केलेला अभ्यास आणि त्यासाठीचे संशोधन, हे मुकेशरावांच्या व्यवसाय – उद्योगातील यशाचे मुख्य शक्तिस्थळ आहे.
विलेपारल्यातील नेहरू रोडवर असलेले दोनशे ग्राहकांना एकाच वेळी सेवा देण्याची क्षमता असलेले ग्रीन हाऊस हे हॉटेल, मुकेशरावांनी मार्च २०१९ मध्ये विकत घेतले. व्यवसायाचा विषय नवा होता आणि आर्थिक दृष्ट्या धाडस फार मोठे होते. मार्च २०२० मध्ये कोरोना साथीने देशाला विळखा घातला आणि पुढचे दीड वर्ष देशातील व्यवहार पूर्ण बंद झाले. हॉटेलमधे केलेल्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीला हा मोठाच धक्का होता. ग्रीन हाऊस मधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून ऐंशी व्यक्तींचा पोशिंदा असलेला हा व्यवसाय संकटात सापडला होतं. आपल्या व्यवसाय व्यवस्थापन अनुभवाचा मोठा फायदा मुकेशरावांना झाला. कोरोना काळांत ताबडतोब त्यांनी पदार्थ बनवून त्यांची होम डिलिव्हरी व्यवस्था सुरू केली. कोरोना काळांत प्रत्येक कर्मचाऱ्याला पूर्ण मासिक वेतन दिले गेले.

^ होम डिलिव्हरी
सप्टेंबर २०२१ पर्यंत कोरोनाची लाट ओसरली आणि ग्रीन हाऊसच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या योजना आखल्या गेल्या. हॉटेलचा व्यवसाय नुकताच सावरायला लागला होता आणि पुनर्विकास योजनेसाठी हॉटेलच बंद होईल अशी शक्यता निर्माण झाली. मुकेश शिपुरकर नावाच्या या चतुर दूरदर्शी उद्योजकाने पुन्हा एकदा धाडसी योजना आखली. नेहरू रोडवरचे ग्रीन हाऊस त्याने विलेपारल्यतच स्थानांतरीत करायचे स्वप्न, वर्ष २०२१ च्या अखेरच्या महिन्यांत पाहिले. जानेवारी २०२२ मध्ये ग्रीन हाऊस हॉटेल, महंत रोडवर पुन्हा उभे राहिलेले आपण पाहिले. मुकेशरावांच्या धाडसी वृत्तीला कणखर निग्रह आणि निर्णय कौशल्याची जोड मिळाली आणि निव्वळ दीड-दोन महिन्यांत हे स्वप्न साकार झाले आहे.

^ ग्रीन हाऊस
शार्गी कॉम्प्युटर्स आणि शार्गी सिस्टिम्स प्रा लिमिटेड या मागोमाग शार्गी बीव्हरेजेस अँड फूड्स् आणि शार्गी प्रोडक्शन अशा श्री मुकेश शिपुरकरांच्या विस्तारलेल्या व्यवसाय – उद्योगाचे, ‘शार्गी कॉम्प्युटर्स’ हे फ्लॅगशिप आहे असेच म्हणायला हवे. स्वराज्यरक्षक संभाजी – जिजाऊ अशा दूरदर्शन मालिका निर्मितीमध्ये शार्गी प्रोडक्शनचा सहभाग होता. – अर्धसत्य हे नाटक पूर्णतः शार्गीची निर्मिती होती. येत्या काळांत लोणावळा आणि आंबोलीतील जागेमध्ये रिसॉर्टची निर्मिती करून हॉस्पिटॅलिटी व्यवसायांतील प्रवेशाची मुकेशरावांची योजना आकार घेते आहे.

^ अर्धसत्य नाटकाची निर्मिती

^ स्वराज्य रक्षक संभाजी < मालिका निर्मिती सहभाग > ^ स्वराज्य जननी जिजामाता
विलेपारल्यातील नागरिकांप्रती मुकेशराव नेहमीच कृतज्ञ भाव व्यक्त करतात. भोवतालच्या समाजाशी – ग्राहक आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रति मुकेशरावांचे बंध खोलवर रुजलेले आहेत. आपल्या यशाची झूल त्यांनी पाठीवर कधीच धारण केलेली नाही. सहजवृत्तीने गप्पा मारणारे गोष्टीवेल्हाळ मुकेशराव अगदी नम्र आणि निगर्वी आहेत. लोणावळा – कोल्हापूरसह मुंबईतल्या आपल्या व्यवसायाचे नियोजन, मुकेशराव आपल्या तीनशे चौरसफुटाच्या ऑफिसातून, या सर्व ठिकाणी लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून करतात. ऑफिसातील मोठ्या पीसी स्क्रीनवर एकाचवेळी किमान पन्नास कॅमेरा फ्रेम त्यांच्या समोर असतात. भेटायला आलेल्या नागरिकांशी बोलताना, या अष्टावधानि उद्योजकाचे लक्ष प्रत्येक कॅमेऱ्यावर असते. आधुनिक सीसी टीव्ही तंत्र यंत्रणेच्याद्वारे केले जाणारे हे व्यवस्थापन फार प्रभावी आहे.
मुकेशराव जन्मतः गाता गळा घेऊन आले आहेत. कुटुंबीय – स्नेही – सुहृद – मित्रपरिवार आणि परिचितांना, मुकेशरावांच्या गायन कौशल्याची ओळख निश्चितच आहे. हा गायनाचा छंद जोपासण्यासाठी त्यांनी काही ऑर्केस्ट्रामध्येही सहभाग घेतला आहे. त्यांचा धाकटा सुपुत्र श्री गौरव वडिलांचा हा वारसा जपतो आहे. तो साडेतीन वर्षाचा असतांना त्याने श्री श्रीनिवास खळे यांच्याकडून पारितोषिक मिळाले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील आपला पदवी अभ्यास पूर्ण करतांनाच, गौरव श्री संजीव चीम्मलगी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकून श्रीमती शुभदा दादारकर यांच्याकडे नाट्यसंगीत शिकला. गेली काही वर्षे गौरव, पंडित सुरेश वाडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतो आहे.

^ श्री गौरीश – श्री मुकेश – सौ नम्रता – श्री गौरव
मोठा सुपुत्र श्री गौरीश, वडिलांकडूनच व्यवसाय नितीचे धडे घेऊन आता ग्रीन हाऊसचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे करतो आहे. गौरीश एक उत्तम अभिनेता आहे. पृथ्वी थिएटर मध्ये त्याने चार वर्षे नाट्यकलेचे धडे गिरवले आहेत.

< श्री मुकेश शिपुरकर
श्री मुकेश शिपुरकर या तरुण यशस्वी उद्योजकाची फक्त तीस वर्षांत झालेली फार मोठी प्रगती आणि त्यातील त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, दूरदृष्टी, विवेक, चातुर्य आणि विश्वासवृत्ती, उभरत्या नव उद्योजकांसाठी आदर्श नीती आहे. श्री मुकेश त्यांचे कुटुंबीय यांच्यासह व्यवसाय – उद्योगातील ग्राहक, सहकारी आणि कर्मचारी या सर्वांना भविष्यातील उपक्रमांसाठी शतशत शुभेच्छा..!

अरुण फडके
Mobile: 7400173637
www.parlebazzar.com
Blog Section
