आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र १ – मार्च, २०२२.
श्री अशोक लेले, सुगंधी अमेय प्रोडक्ट्स
निसर्गत: प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात एक स्वाभाविक कल असतो – एक निसर्गदत्त क्षमाता आणि कौशल्य दडलेले असते (Aptitude). याचा परिचय काही व्यक्तींना फार तरुण वयांतच होतो आणि त्यादिशेने त्यांचा प्रवास आणि त्यांचे शिक्षण सुरू होते. मात्र अनेकदा हे बाह्य स्वरूपाचे शिक्षण औपचारीक असते आणि स्वाभाविक कलापेक्षा भिन्न असते. प्राथमिक गरजेपोटी अशा व्यक्ती आपला स्वाभाविक कल विसरून, उपजीविकेच्या दिशेने मार्गस्थ होतात. मात्र अंतर्मनाचा कल त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
आपल्या अशोकराव लेले यांचे नेमके असेच झाले. वर्ष १९५४ मध्ये तत्कालीन इंटर सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व्हीजेटीआय मध्ये प्रवेश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हार्सिटि मध्ये त्यांनी टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला होता. बडोद्यातल्या वास्तव्यात पदवी प्राप्त झालीच मात्र त्या बरोबरच स्थानिक गुजराती बोली भाषेचा परिचय झाला ज्याचा नंतरच्या काळांत व्यवसायात उपयोग झाला.
शिक्षण संपवून अन्य काही नोकऱ्या केल्यानंतर, वर्ष १९६६ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी अशोकराव बॉम्बे डाईंग या कापड उद्योगातील मोठ्या कंपनीत नोकरीसाठी टेक्स्टाइल इंजिनियर या पदावर रुजू झाले आणि वर्ष १९९६ मध्ये याच कंपनीतून निवृत्त झाले. वयाच्या साठीपर्यंतचा हा सगळा प्रवास, खरं तर तीसऱ्या सहस्त्रकाच्या आधी निवृत्त झालेल्या कुठल्याही सुशिक्षित, कुटुंबवत्सल गृहस्थाच्या कारकीर्दीला साजेसाच होता. मात्र अशोकरावांचा स्वाभाविक कल, त्यांना वेगळ्या मार्गाने नेण्यासाठी याच काळांत प्रभावी ठरला होता.

सौ आशाताई आणि श्री अशोकराव लेले
या दरम्यान विवाहपश्चात, वर्ष १९६९ मध्ये अशोकराव, कुटुंबासह विलेपारल्यात स्थायिक झाले होते. चातुर्य-दूरदृष्टि-धाडस या उद्योजकाला आवश्यक असलेल्या निसर्गदत्त गुणवत्ता प्राप्त झालेल्या अशोकरावांनी यानंतरच्या काळांत, नोकरी करत असतानाच, कापड विक्रीचा छोटा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. याचवेळी अंतर्मनाने दिलेल्या प्रेरणा आणि उर्जेने अशोकरावांनी तीन परफ्यूम बनवली होती. अमेय प्रॉडक्टच्या सुगंधी उत्पादनांचा हाच श्रीगणेश होता. तरीही अस्वस्थता होतीच कारण नियतीने त्यांच्यासाठी आखलेला मार्ग अंधुकसा दिसत होता.
आपल्या श्रद्धाळू आणि भक्तिमार्गी समाजात, गरीब कुटुंबाच्या चाळीतील छोट्याशा घरांत आणि धनवान कुटुंबाच्या अलीशान घरांत रोजच्या प्रार्थनेसाठी अगरबत्तीचा वापर होतोच. अगरबत्ती बनविण्याच्या प्राथमिक प्रक्रिया आणि सामानाची आवश्यकता याचा अभ्यास करून फेब्रुवारी १९८२ मध्ये अशोकरावांच्या अगरबत्ती निर्मितीच्या सुगंधित लघुउद्योगाची सुरुवात झाली होती. याच नेमक्या काळांत श्री दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाची हाक दिली होती आणि नंतरच्या काळांत गिरणी कामगारांच्या दैनंदिन जीवनावर याचा दीर्घकालीन परिणाम झाला होते.
अशोकरावांना मात्र नियतीने आखून दिलेला मार्ग सापडला होता असे म्हणायला हरकत नाही. वर्ष १९८२ मधे मुंबई ग्राहक पेठे आणि १९८५ मध्ये विलेपारल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या ग्राहक पेठेत अशोकरावांनी आपल्या अगरबत्त्या आणि अन्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली. या ग्राहकपेठेत ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यामुळे, दोनच वर्षांत अशोकरावांना, यावर्षी नवीन सुगंधित उत्पादन काय, अशी विचारणा सुरू झाली होती. हे फार उत्साहवर्धक होते आणि त्यामुळे नवीन उत्पादने बनविण्याची प्रेरणा मिळाली होती. या अनुभवाने आत्मविश्वास वाढला आणि मुंबईतल्या अन्य ग्राहकपेठांमध्ये सहभाग घ्यायला अशोकरावांनी सुरुवात केली होती. दादर व्यापारीपेठ म्हणजे नव्याने लघुउद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांसाठी एक ट्रेनिंग कॅम्पच आहे असा आपला अनुभव अशोकराव सांगतात. आता अगरबत्यांबरोबरच, वैयक्तिक वापरासाठी आणि घरांत वापरल्या जाणाऱ्या अन्य सुगंधित उत्पादनांचा विस्तार झाला होता. पारल्यात स्वतःची छोटी जागा घेऊन या सर्व उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती.
वर्ष २००० मध्ये मुलगा श्री सुनीलने, अमेय प्रॉडक्टच्या काही जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि तो वडिलांच्या व्यवसायांत सामील झाला. वर्ष १९९६ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अमेय प्रॉडक्टने विलेपारले बाजारात एक दुकान घेतले होते. आता अशोकरावांची लोकप्रिय झालेली सर्व सुगंधी उत्पादने ग्राहकांना बाजारात उपलब्ध झाली होती. श्री सुनीलच्या सहभागाने परफ्यूम निर्मितीला वेग आला होता. स्नानगंधा – टॉयलेट परफ्यूम – सेंटेड बॅग्स – कपडे धुताना वापरायचे परफ्यूम – कार परफ्यूम – रूम फ्रेशनर – कपड्यांवर मारायचे नैसर्गिक सुगंध परफ्यूम अशी अमेय प्रॉडक्टची सर्व उत्पादने आता लोकप्रिय झाली आहेत.

अमेय प्रॉडक्ट्सचे दुकान, महात्मा गांधी रोड, विलेपारले पूर्व
या व्यवसायाची कुटुंबाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, या व्यवसायातील शिक्षणाची पदवी नसतांना, निव्वळ आपल्या स्वयंप्रेरणेने आणि निसर्गदत्त उर्जेने श्री अशोकराव लेले यांनी सुरू केलेल्या व्यवसायाने आता चाळीस वर्षे पूर्ण केली आहेत. अथक श्रम – ग्राहकांच्या गरजांचा योग्य अभ्यास – उत्पादनांचा उत्तम दर्जा – नाविन्याचा शोध – दीर्घकालीन अनुभव या अशोकरावांच्या गुणवत्ता हे त्यांच्या यशस्वी झालेल्या धाडसाचे मूळ सूत्र आहे. स्टार्टअप आणि मेक इन इंडिया या संज्ञांचा परिचय होण्याआधी चाळीस वर्षे सुरू केलेल्या या सुगंधी उत्पादनांच्या व्यवसायाने आज अमेय प्रॉडक्ट या नावाने आपला ब्रॅंड यशस्वी केला आहे. चिरंजीव श्री सुनीलच्या नेतृत्वाखाली अशोकरावांचा व्यवसाय प्रगत आणि समृद्ध झाला आहे, नवीन आव्हाने स्वीकारतो आहे.
स्टार्टअप आणि मेक इन इंडिया या राष्ट्रीय उद्योग प्रवाहात सामील होणाऱ्या प्रत्येक तरुण – तरुणीने अशोकरावांचा आदर्श ठेवावा ही नम्र अपेक्षा. श्री अशोकराव लेले आणि कुटुंबीयांना अनेकानेक शुभेच्छा..!

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
